बीड : तुझ्याच्याने वेळेवर पैसे देणे होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, असे म्हणत धमकी दिली, तसेच वेळोवेळी घरी जाऊन व्याजाच्या पैशाबाबत मानसिक त्रास देऊन बीडमधील एका व्यापाऱ्यास आत्महत्या करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पेठबीड पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल झाला. राम फटाले असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शहरातील पेठ बीड येथील दिलीप फटाले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता त्यांनी राम यास आवाज दिला, मात्र तो आला नाही. त्यानंतर त्यांनी सुनेला विचारणा केली. नंतर घरासमोर अधर्वट बांधकामाच्या चौकटीला नॉयलॉनच्या दोरीने रामने गळफास घेतल्याचे दिसले. घरच्या लोकांनी राम यास खाली उतरवले व गळफास सोडला. तेव्हा राम हा बेशुद्ध झाला होता. औषधोपचारासाठी राम यास ऑटो रिक्षातून सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. रामच्या निळ्या रंगाच्या नाइट पँटच्या खिशामध्ये आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळून आली, ती चिठ्ठी पोलिसांना देण्यात आली.
काय म्हटले चिठ्ठीतडॉ. लक्ष्मण आश्रुबा जाधव व त्याची पत्नी वर्षा जाधव यांनी मानसिक छळ केला आहे. मी त्यांच्याकडून व्याजाने घेतलेले पैसे परत केले तरी जाधव त्रास देत होता, असे चिठ्ठीत नमूद आहे. राम याने सात वर्षांपूर्वी डॉ. लक्ष्मण जाधव यांच्याकडून अडीच लाख रुपये दहा रुपये टक्के व्याजाने घेतले होते. ती रक्कम लॉकडाऊनपूर्वी परत केली. त्यानंतरही जाधव घरी जाऊन २५ हजार रुपये महिना याप्रमाणे पैसे घेऊन जात होता. त्याच्याकडे दिलेले बँकेचे चेकही परत दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नेहमी दिला त्रास४ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता दिलीप फटाले व राम हे घरी असताना डॉ. लक्ष्मण जाधव व पत्नी वर्षा जाधव हे घरी गेले. राम यास म्हणाले की, तुझ्याच्याने वेळेवर पैसे देणे होत नसेल तर तुझी पत्नी घरी आणून सोड असे म्हणत धमकी देऊन गेले, तसेच इतरांनी व्याजाच्या पैशाबाबत मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले, या तक्रारीवरून डॉ. लक्ष्मण आश्रुबा जाधव, वर्षा जाधव, दिलीप उघडे, के.के. काशीद मेडीकलवाला, मधू चांदणे, वारे नामक महिला, मस्के (पूर्ण नाव नाही) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे.
माती करण्यासाठी समाजाकडून वर्गणी करावीमाझ्या वडिलांकडे माती करण्यासाठी पैसे नाहीत. माझी माती करण्यासाठी समाजाकडून वर्गणी करावी, माझा दहावा, तेरावा-चौदावा करू नका, ही माझी इच्छा आहे. मी चांगला मुलगा, पती, वडील होऊ शकलो नाही, मला माफ करा..., असे राम याने चिठ्ठीत लिहिले आहे.