बीड : परळी येथील महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी पाटोदा येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी युवक जिल्हाध्यक्ष विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांचा तपासी अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांनी जबाब नोंदविला.
महादेव मुंडे यांचा २२ ऑक्टोबर २०२३ रोजी खून झाला होता. १८ महिने उलटूनही याचा तपास लागलेला नाही. त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी याबाबत आंदोलनेही केली होती; परंतु पोलिस अद्यापही मारेकऱ्यांपर्यंत पोहचलेले नाहीत. दरम्यान, २ जुलै रोजी पाटोदा येथील बाळा बांगर यांनी ‘महादेव मुंडे यांचा मांसाचा तुकडा आरोपींनी वाल्मीक कराड यांच्या टेबलासमोर आणून ठेवला होता,’ असा दावा केला. हे ऐकून महादेव यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी त्यांचा जबाब घेऊन आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ४ जुलै रोजी तपास अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस अधीक्षक मीना यांनी बाळा बांगर यांचा जबाब घेतला. यामुळे आता तपासाला गती येऊ शकते.