- नितीन कांबळेकडा ( बीड) : सांगवी आष्टी येथे पुरात वाहून आलेल्या एका महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. रामकंवर कचरू जगताप ( ४५, रा. शिराळ ता.आष्टी) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. त्या एक भिक्षेकरी असून निराधार होत्या. त्यांच्या अचानक मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी दुपारी सांगवी आष्टी येथे एका महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.तहसीलदार वैशाली पाटील या देखील घटनास्थळी होत्या. रविवारी रात्री सरपंच संदिप खेडकर आणि ग्रामस्थांसह गोताखोर रावसाहेब पिंपळे,हौसराव पिंपळे,शंकर बर्डे, महादेव बर्डे, उत्तम पिंपळे,बाबासाहेब गायकवाड यांच्या मदतीने रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
आज दुपारी मृतदेहाची ओळख पटली असून शिराळ येथील रामकंवर जगताप यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना पती अपत्य कोणीही नसल्याने त्या एकट्याच राहत होत्या. आष्टी आणि मिरजगाव येथे भिक्षा मागून त्या उदरनिर्वाह करत असत. त्यामुळे त्यांचे घर बंद असायचे. त्या हरवल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. मृतदेह सापडल्यानंतर काही तासांत त्यांची ओळख पटली आहे. घटनास्थळी तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, वैद्यकीय अधिकारी, सरपंच संदिप खेडकर, पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, मजरूद्दीन सय्यद, याच्यासह बाहेरीर गोताखोर उपस्थित होते.