- नितीन कांबळेकडा: रात्रीपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने आष्टी तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून रहदारीसाठी असणारे मोठमोठे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आष्टी तालुक्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पुर आला आहे. पुराचे पाणी शेतात घुसून शेतांना नदीचे स्वरूप आल्याचे दिसून आले. कडा, खिळद, सुलेमान देवळा, शिराळ, देवीनिमगाव, धानोरा, महेश मंदिर, केरूळ यासह अनेक गावातील रहदारीसाठी असणारे मोठमोठे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नदीकाठच्या लोकांनी सुरक्षीत स्थळी थांबावे. कसलाही धोका पत्कारू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून रस्त्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पावसाने संपूर्ण तालुक्यात जोर धरला आहे. नगर-बीड मार्गावरील कडा नदीवर पाण्याची पातळी वाढली असून कोणत्याही क्षणी मार्ग बंद होऊ शकतो. तसेच कडा-धामणगांव महामार्गावर असलेल्या देविनिमगांव पुलावरून पाणी जात आहे. आष्टी-मिरजगांव मार्गावर असलेला इमनगांव तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तर शिराळ येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा ही मार्ग बंद आहे. पुलावरून पाणि वाहत असताना नागरिकांनी सेल्फी काढणे, स्टंटबाजी करत पुरातून गाडी घालू नये, सतर्क राहा, प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन आष्टीच्या तहसिलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.