लोकमत न्यूज नेटवर्क बीड : चार दिवसांपूर्वी पवनचक्कीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दाेन गटांत वाद झाले. यात मस्साजोगच्या सरपंचांनी मध्यस्थी केली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हाही दाखल झाला. याच मारहाणीचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. याचाच राग आरोपींच्या मनात होता. हे सर्व सरपंचाने केल्याच्या गैरसमजुतीतून सहा जणांनी अपहरण करून सरपंचाचा खून केला. हा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. यात सहापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून, चौघे फरार आहेत. आरोपींनी अपमान झाल्यानेच हे कृत्य केल्याचे सांगितले.
पोलिस पथके रवानासंतोष देशमुख (रा.मस्साजोग, ता.केज) असे मृत सरपंचाचे नाव आहे. जयराम माणिक चाटे (वय २१, रा.ता.केज), महेश सखाराम केदार (२१, रा. ता.धारूर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत, तर सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे (दोघे, रा.टाकळी, ता.केज), कृष्णा आंधळे (रा.ता.धारूर) असे फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
मनोज जरांगे यांची भेटमराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी दुपारी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची तसेच केजमधील आंदोलकांचीही भेट घेतली. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
लोक रस्त्यावरआरोपींना अटक करावी, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, यासारख्या विविध मागण्यांसाठी मस्साजोग येथे ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले होते, तसेच केज शहरातही मुख्य रस्ता अडविण्यात आला. सायंकाळी एक बसही जमावाने पेटविली.
देशमुख खून प्रकरणातील फरार चौघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा गतीने आणि सर्व बाजूने तपास केला जाईल. आंदोलकांनी संयम व विश्वास ठेवावा. - सचिन पांडकर, अपर पोलिस अधीक्षक, बीड.