लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनामुळे राज्यभर लॉकडाऊन केले. राज्याचे निर्बंध काही प्रमाणात शिथील असले तरी जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन पूर्ण लॉकडाऊन केले. यात केश कर्तनालय, सलून, पार्लरच्या दुकानांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या दुकान मालक, चालक आणि येथे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर सामान्यांनाही आता गतवर्षी प्रमाणेच घरातच दाढी-कटींग करावी लागणार आहे. महिनाभर हे हाल होणार आहेत.
बीड शहरात केश कर्तनालयाची साधारण ४०० दुकाने आहेत. त्यात काम करणाऱ्यांची संख्या ९०० पेक्षा जास्त आहे. एका कामगाराला दिवसाकाठी साधारण ३०० ते १००० रूपयांपर्यंत रोजगार मिळत असे. परंतु, आता कोरोनामुळे सलून दुकाने बंद केल्याने या सर्वच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. केवळ सलून हाच व्यवसाय असल्याने आणि लॉकडाऊनमुळे हाताला दुसरे काम मिळत नसल्याने कुटूंब चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित राहिला आहे.
दरम्यान, शासन आणि प्रशासनाने लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध करावेत. कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी, पण लॉकडाऊन उठवावे, अशी मागणी कामगारांसह संघटनांकडून होत आहे.
भाडे निघणेही होत आहे अवघड
बोटावर माेजण्याइतक्याच लोकांचे दुकान हे स्वता:च्या जागेत आहेत. इतर सर्व लोकांनी किरायाच्या गाळ्यातून हा व्यवसाय करतात. लॉकडाऊनमुळे अगोदरच वर्षभर खिशातून भाडे द्यावे लागले होते. आता पुन्हा तीच वेळ आल्याने या व्यावसायिकांना काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता घर कसे चालवायचे?
घरात आठ माणसे आहेत. ५ कि.मी.अंतर कापून शहरात जात होतो. कसा तरी ३०० रुपये मिळालेल्या रोजातून कुटूंब चालवायचो. आता लॉकडाऊनने उपासमार होत आहे.
भागवत राऊत कारागिर
लॉकडाऊनमुळे व्यावसायाला पूर्ण ब्रेक बसला आहे. अगोदरच कोरोनाच्या भितीने लोक येत नव्हते. थोडे फार यायचे त्यांतून मिळालेल्या पैशावर घर चालायचे. आता पुन्हा सर्वच थांबले आहे.
पप्पू झांबरे, सलून चालक
लॉकडाऊन करा नाहीतर आणखी काही पण करा. फक्त महिन्याला १० हजार रुपये आम्हाला द्या. नसेल देणे होत तर आमच्या हाताला काम द्या. त्यातून आम्ही घर चालवू.
पंढरीनाथ शिंदे, कारागिर
लॉकडाऊन काळात १६ लोकांनी आत्महत्या केल्या. आता पुन्हा आणखी तीच वेळ आली आहे. शासनाला आणि प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की निर्बंध कडक करून सलून परवानगी द्या. आम्ही याबाबत प्रशासनाला निवेदनही देणार आहोत.
सुनिल दाेडके, शहराध्यक्ष सलून दुकान चालक-मालक बीड