बीड : केज तालुक्यातील धर्माळा येथे शुक्रवारी सायंकाळी वैयक्तिक वादातून एकाने कोयत्याने हल्ला केला. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धर्माळा येथील वैजनाथ भैरवनाथ सोळंके याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो घरासमोर उभा होता. या दरम्यान तेथे गणेश मिठू खदम हा कोयता घेऊन आला. विनाकारण वैजनाथच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर आणि बोटावर कोयता चालविला. तसेच दुचाकी क्र. एम. एच. २३, इ. ४९४१ फोडून नुकसान केले. तर एमएच १२ इ. प. ३०६५ दुचाकीच्या सीटवर कोयता मारुन नुकसान केले. हे भांडण सुरु असताना वैजनाथचे वडील भैरवनाथ सोळंके व भागवत राजाभाऊ कदम यांनी सोडविले. यानंतर २०० मीटर अंतरावरील हनुमान मंदिरासमोर कार्यकर्ता बैठक होती, तेथे जाऊन गणेशने खुर्च्यांची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, धर्माळा येथील हा प्रकार गणेश कदम याने दारुच्या नशेत केला आहे. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला आहे. याचा राजकीय संबंध नसून अफवा पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात धर्माळा येथील एकावर कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:36 IST