- नितीन कांबळेकडा ( बीड) : आष्टी-सांगवी क्षेत्रातील नागापूर सांगवी बंधाऱ्याचे लोंखडी गेटची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना मंगळवारी रात्री आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. आरोपींमध्ये एका अल्पवयीनसह दोघांचा समावेश आहे. या आरोपींकडून बंधाऱ्याच्या लोंखडी गेट चोरीच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. आष्टी तालुक्यातील आष्टी-सांगवी क्षेत्रातील नागापूर सांगवी बंधाऱ्याचे लोंखडी गेट चोरटे लंपास करत असल्याची गोपनीय माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांना मिळाली. यावरून पोलिस हवालदार अशोक शिंदे, पोलिस नाईक विकास जाधव, वाहन चालक उदावंत यांच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान तिघाजणांना रंगेहाथ पकडून मुद्देमालासह अटक केली आहे.
पाटबंधारे विभागातील कर्मचारी मारूती आबा पवार याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात मयुर अशोक लष्कर ( रा.भैरूबावाडी.जि.अहिल्यानगर) , विकास विजय विटकर आणि एक अल्पवयीन ( रा. शेकापूर रोड आष्टी,ता.आष्टी) यांच्यावर कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर करीत आहेत.
अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता!आष्टी पोलिस ठाणे हद्दीत काही महिन्यापूर्वी नांदा व धिर्डी येथील दोन ठिकाणच्या बंधाऱ्याचे लोंखडी गेट चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनांची देखील आरोपींकडून उकल होण्याची शक्यता आहे.