- संजय खाकरेपरळी : दाऊतपूर राख बंधाऱ्यातून गेल्या दहा दिवसांपासून राखेचा होत असलेला अनधिकृत उपसा जरी बंद असला, तरी थर्मलजवळील वापरात नसलेल्या जागेत अनेक वर्षांपासून राखेचे ढिगारे तयार करण्यात आले आहेत. सध्या दाऊतपूर व दादाहारी वडगाव शिवारातील साठेबाजी केलेल्या ढिगाऱ्यातून राख हायवामध्ये टाकून राखेची वाहतूक करून विक्री गेल्या दोन दिवसांपर्यंत चालू होती. त्यामुळे बेकायदेशीर राखेची वाहतूक चोरी चोरी, छुपके... छुपके चालूच आहे. शनिवारी रात्री परळी-मिरवट मार्गावर राख टिप्परच्या धडकेने सौंदना गावच्या सरपंचांचा मृत्यू झाल्यानंतर परळीत राखेची अवैध वाहतूक सुरू असल्याचे अधारेखित झाले.
दाऊतपूर व दादाहारी वडगाव शिवारात राखेचे साठे कोणी केले, हा शोधाचा विषय असून, साठवलेल्या राखेच्या ढिगाऱ्यांमुळे प्रदूषणाचा नाहक त्रास दादाहरी वडगावच्या ग्रामस्थांना मात्र सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दादाहारी वडगावचे ग्रामस्थ विविध आजारांनी त्रस्त असून, दूषित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. याशिवाय जनावरांनासुद्धा राखमिश्रित पाणी प्यावे लागत आहे. याकडे थर्मल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप दादाहारी वडगावच्या ग्रामस्थांकडून केला जात आहे. परळी तालुक्यातील दादाहारी वडगावच्या ७५ टक्के जमिनी या दाऊतपूर राख बंधाऱ्यासाठी संपादित केलेल्या आहेत. दाऊतपूरच्या राख बंधाऱ्यातून टाकाऊ राखेचा उपसा करून त्यातील राख थर्मल परिसरातील जागेत साठविण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून दाऊतपूर बंधाऱ्यातील राखेचा उपसा अनधिकृतपणे बंद करण्यात आला आहे. असे असले तरी राखेचा जुना स्टॉक वापरण्यात येत असून, त्याची वाहतूक होत आहे.
शनिवारी रात्री राखेच्या हायवाने धडक दिल्याने दुचाकीस्वार सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे. थर्मल प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे बेकायदेशीर राखेची वाहतूक परळीत चालू असून, राख हायवा वाहतूक बंद झाली नसल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी रविवारी केला होता.
प्यायला राखमिश्रित पाणीदाऊतपूर राख बंधाऱ्यातील व साठवणूक केलेल्या बेकायदेशीर राखेच्या ढिगाऱ्यातील राखेचे कण हवेने उडून घराघरांत पसरत आहेत. त्याचा दादा वडगावच्या ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून त्रास होत असून, विविध आजार होत आहेत. हे राखेचे प्रदूषण बंद करावे, यासाठी थर्मल प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु, याकडे लक्ष दिलेले नाही. राखेच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागते, एवढेच नव्हे तर जनावरांनासुद्धा राखमिश्रित पाणी प्यायला मिळत आहे.- अश्विनी शिवाजी कुकर, सरपंच, दादाहरी वडगाव, ता. परळी
गुन्हे दाखल करण्यात येतीलपरळी शहरातून संभाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतून बेकायदेशीर राखेच्या वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व यापुढेही गुन्हे दाखल करण्यात येतील.- धनंजय ढोणे, पोलिस निरीक्षक, संभाजीनगर परळी.
वाहतूक बंद असल्याचा पोलिसांचा दावागेल्या आठ दिवसात परळी शहर पोलिसांनी मोटर वाहन कायद्यानुसार राख हायवा वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या परळी शहरातून राखेची वाहतूक बंद असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर दाऊतपूर राख बंधाऱ्यातून राखेचा अनधिकृत उपसा गेल्या काही दिवसापासून बंद असल्याची माहिती परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या सूत्रांकडून देण्यात आली. ही राख निविदाधारकांना देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. परंतु, त्यासंदर्भात आणखी निर्णय जाहीर करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले.