बीड : ३ मे रोजी बीडमधील एका हॉटेलात साक्षगंध कार्यक्रम झाला. मुलगी तिच्या गावी गेली. सुट्ट्याही आणखी काही दिवस बाकी होत्या. असे असतानाच भारत-पाकिस्तान युद्धाची बातमी समजली. मध्यरात्रीच कॉल आला आणि बीडचा करण सूर्यकांत महाजन हा देशसेवेसाठी रवाना झाला. हवाई दलात तो फ्लाइंग ऑफिसर म्हणून कर्तव्य बजावत आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
बीडमधील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत महाजन यांचा मुलगा करण याने आयआयटीमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले. आपणही भारतीय सैन्य दलात काही करून दाखविले पाहिजे, अशी आवड त्याच्या मनात निर्माण झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर होणाऱ्या सेंट्रल डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) या परीक्षेची २०१६ पासून करणने तयारी सुरू केली. डिसेंबर २०१७ मध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली. तो सहा महिन्यांतून १ महिना सुट्टीवर गावी बीडला येत असे. आताही तो १४ एप्रिल रोजी एक महिन्याच्या सुट्टीवर आला होता. अशातच त्याचा हाॅटेल मॅनेजमेंट करणाऱ्या महेक नेब (रा. भिलाई, छत्तीसगड) हिच्याशी ३ मे रोजी बीडमधील एका हॉटेलमध्ये थाटात साक्षगंध कार्यक्रम झाला. लग्नाची तारीख ठरविण्याची चर्चा सुरू असतानाच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अनुषंगाने मध्यरात्रीच करणला कॉल आला. कसलाही विचार न करता पहिल्या विमानाने देशसेवेसाठी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी रवाना झाला. महेक ही आता आपल्या गावी गेल्याचे सांगण्यात आले.
पगार, ड्युटी असा जॉब नकोकरण महाजन फ्लाईंग ऑफिसर होताच ‘लोकमत’ने त्याची मुलाखत घेऊन ६ डिसेंबर २०१७ रोजी प्रकाशित केली होती. यामध्ये त्याने पगार, ड्युटी असा रूटीन जॉब करायचा नाही. आपल्यापासून ५०, १०० जण इन्स्पायर होतील, असे काम करण्याचा मानस त्याने बोलून दाखविला होता. आज तो खरा ठरत असल्याने कुटुंबाला तर समाधान आहेच, परंतु बीडकरांनाही करणचा अभिमान आहे.
सैन्य दलाला ताकद देवोभारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्य दल मोठ्या हिंमतीने सामना करून पाकिस्तानवर वरचढ ठरत आहे. यासाठी लढा देणाऱ्या सर्वच दलातील सैन्यांना ताकद देवो, अशी प्रार्थना बीडकर करताना दिसत आहेत.