पुरुषोत्तम करवा
माजलगाव : येथील मोंढ्यात दीड महिन्यांच्या कालावधीत सोयाबीन, तूर व हरभऱ्याची एकूण १२ हजार क्विंटल आवक झाली. या काळात सोयाबीनला उच्चांकी साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर या माध्यमातून शेतकऱ्यांना साडेपाच कोटी रुपये मिळाले.
१ एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. त्यानंतर पंधरा दिवस मोंढा सुरू होता. त्यानंतर तब्बल दीड महिना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे व लॉकडाऊनमुळे जवळपास एक महिना वेळेअभावी व्यापाऱ्यांनी मोंढा बंद ठेवला होता. पावसाळ्याचे दिवस तोंडावर आल्याने व शेतकऱ्यांना बियाणे व खते खरेदी करण्यासाठी घरातील माल विकल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. १ जूनपासून मोंढा पुन्हा सुरू झाल्यानंतर सोयाबीन, तूर व हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात व १ ते २२ जूनपर्यंत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सोयाबीन, तूर व हरभरा मिळून १२ हजार ३१७ क्विंटल खरेदी करण्यात आली. यात तूर ४ हजार ११९ क्विंटल, हरभरा ६ हजार ३९३ क्विंटल तर सोयाबीनची १ हजार ६०४ आवक होती. या वेळी सोयाबीनला ७ हजार ५०० तर कमीत कमी ६ हजार २०० रुपये भाव मिळाला. तुरीला कमाल ६ हजार ५३० तर किमान ६ हजार रुपये तर हरभऱ्याला जास्तीत जास्त ४ हजार ५०० व कमीत कमी ४ हजार रुपये भाव मिळाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भारत शेजुळ यांनी दिली.
शेतकऱ्यांना तूर, हरभरा व सोयाबीनच्या विक्रीतून ५ कोटी ४७ लाख ८५ हजार २१८ रुपये मिळू शकले. हे सर्व धान्य विक्री करून मिळालेल्या पैशातून बी-बियाणे व खते खरेदी करत खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या आहेत.
----
गेल्या वर्षीच्या सोयाबीनला या वर्षी उच्चांकी भाव मिळाल्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात असल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीनला पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
----------