माजलगाव : येथील केसापुरी कॅम्पजवळ असलेल्या व्यंकटेश लाँन्स या ठिकाणी असलेल्या कोरोना केंद्रातील रुग्णांना जागा मालक मानसिक त्रास देत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बाहेर बसलेल्या रूग्णांना आत येता येऊ नये म्हणून कुलूप लावून घेणे, रात्री ११ नंतर संपूर्ण लाईट बंद करणे असा त्रास जागा मालक जाणूनबुजून देत असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. रूग्णांना रात्र अंधारात काढावी लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेक प्रकारे त्रास असूनही प्रशासनाकडून या लाँन्स चालकास अभय दिले जात असल्याचा आरोप रूग्ण करत आहेत.
माजलगाव शहर व तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे चार नव्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या चार ठिकाणी जवळपास 350 कोरोना पाँझीटीव्ह रूग्णांना ठेवण्यात आले आहे. यापैकी व्यंकटेश लॉन्स या ठिकाणी 107 रुग्ण आहेत. यापैकी 90 रुग्णांना येथील खुल्या जागेत ठेवण्यात आले आहेत. त्यांना केवळ दोनच शौचालय व दोनच बाथरूम आहेत. यामुळे या रुग्णांची मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच मागील आठ दिवसांपासून याची स्वच्छता देखील करण्यात आली नाही. यातच या लॉन्स चालकाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप येथील रुग्णांकडून होत आहे.
मंगळवारी दुपारी येथील काही रुग्ण बाहेर खुल्या हवेत बसलेली होती. मात्र, येथील वॉचमनने अचानक आतमधील गेटला कुलूप लावून घेतले आणि तो बाहेर निघून गेला. प्रयत्न करूनही तो परत आला नसल्याने रुग्णांनी चक्क कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर रात्री 11 वाजता रुग्ण झोपलेल्या ठिकाणची लाईट बंद करण्यात आली. यामुळे रुग्णांची गैरसोय झाली असून त्यांना रात्र अंधारातच काढावी लागली. दरम्यान, कोविड केंद्रास इच्छा नसतानाही लाँन्सची जागा द्यावी लागल्याने मालकाकडून रुग्णांना मुद्दाम त्रास देण्यात येत असल्याचा आरोप येथील रुग्णांनी केला आहे. येथील त्रासाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतरही प्रशासनाकडून या संतापजनक प्रकाराची कसलीही दखल घेण्यात आली नसल्याने रुग्णांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे.
संबंधीत लाँन्स मालकाकडून रूग्णांना अशा प्रकारे त्रास देणे योग्य नाही. याबाबत खरेच असा प्रकार झाला आहे का याची माहिती घेण्यात येईल. त्यानंतर संबंधीत जागा मालकावर कारवाई करण्यात येईल.- वैशाली पाटील , तहसीलदार