अनिल भंडारी
बीड : पाणी आणण्यासाठी गेलेला मुलगा पाय घसरून विहिरीत पडल्याचे समजताच जिवाची कसलीही पर्वा न करता अंगणवाडी मदतनीस व तिच्या मुलाने धाडसाने उडी मारून त्याला वाचविले. ३ मार्च रोजी दुपारी केज तालुक्यातील कोरेगाव येथे ही घटना घडली. ही वार्ता समजल्यानंतर या मायमाउलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केज तालुक्यातील कोरेगाव येथील शेतात वैभव बळीराम लांब (वय १४, इयत्ता नववी) हा आईवडिलांसोबत शेतात गेला होता. आई-वडील शेतात कांदा कापणी करत होते, तर वैभव आणि त्याचा लहान भाऊ निखिल विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरून वैभव विहिरीत पडला. भाऊ विहिरीत पडल्याने घाबरलेला निखिल रडत आणि मदतीसाठी ओरडत होता. याच दरम्यान कोरेगाव अंगणवाडी क्र. २च्या मदतनीस ऊर्मिला प्रल्हाद पायाळ या त्यांचा मुलगा आदित्यसोबत रोजंदारीच्या कामावर गहू काढण्यास शेतात पोहचल्या होत्या. तेथे आवाज ऐकून विचारल्यानंतर रडणाऱ्या निखिलने दादा, विहिरीत पडल्याचे सांगताच ऊर्मिला पायाळ यांनी डोक्यावरची पाटी बाजूला ठेवली. कोरेगाव परिसरातील ही विहीर अडचणीची होती. तसेच पाणीही भरपूर होते. मात्र दोघांना पोहता येत असल्याने ऊर्मिला व त्यांच्या आदित्यने क्षणभरही न थांबता थेट विहिरीत उडी मारली. बुडणाऱ्या वैभवच्या सदऱ्याला धरून त्याला काही वेळातच बाहेर काढण्यात यश मिळविले.
बरं झालं तुझ्यामुळे आमचं लेकरू वाचल्याची भावना व्यक्त करत वैभवचे वडील बळीराम व आईने तसेच परिसरात जमा झालेल्या महिला, पुरुषांनी ऊर्मिला पायाळचे कौतुक केले.
-------
अशी समजली घटना
४ मार्च रोजी केज येथे बालविकास प्रकल्पात अंगणवाडी पर्यवेक्षिकांची बैठक हाेती. यावेळी कोरेगावातील ही घटना पर्यवेक्षिका मंगल गिते यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा लटपटे यांना दिली. त्यांनी ही बाब बीड येथील महिला बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रामेश्वर मुंडे यांना कळविली. मुख्य कार्यकारी अधिकरी अजित कुंभार यांनी या घटनेची दखल घेत अंगणवाडी मदतनीस पायाळ यांच्या कार्याची प्रशंसा केली.
--------
आयुष्यातला सर्वात मोठा आनंद
माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. इतरांच्या मदतीला धावणे मला आवडते. आयुष्यात कसल्याही संकटाचा मुकाबला करता यावा म्हणून मुलाला घडविले. दोन्ही मुलीही शिकल्या, सध्या पुणे येथे लष्करी छावणीत व पोलीस कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. स्वसंरक्षण, वाहने चालविण्यातही त्या पारंगत आहेत. - ऊर्मिला पायाळ, अंगणवाडी मदतनीस, कोरेगाव, ता. केज.
--------
अशा प्रसंगांमध्ये धाडस लागते. अंगणवाडी मदतनीस उर्मिला पायाळ यांनी प्रसंगावधान राखून धाडसाने मुलाला वाचविले, ही घटना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी गौरव करणार आहोत. - अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड.
===Photopath===
050321\052_bed_25_05032021_14.jpeg
===Caption===
अंगणवाडी मदतनीस उर्मिला प्रल्हाद पायाळने विहिरीत उडी मारून वैभव लांब नामक मुलाला वाचविले,