बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रभर शहर पातळी, गाव पातळीवर मोठ्या उत्साहात साजरी होत असते. त्याअनुषंगाने बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १४ एप्रिल रोजी जयंती साजरी करण्यासाठी दोन दिवस संपूर्ण मार्केट चालू ठेवावे, अशी मागणी नगरसेवक गणेश वाघमारे यांनी केली आहे. शासनाचे नियम पाळून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
छोट्या-मोठ्या व्यापारासाठी संधी द्यावी. कपडा मार्केट, रेडिमेड ड्रेसेस, अभिवादन करण्यासाठी फुलहाराची दुकाने कमीत कमी दोन दिवस उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्व समाजबांधवांच्या वतीने नगरसेवक वाघमारे यांनी केली आहे.
शासनाचे सर्व नियम पाळून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. त्यामुळे घराघरात उत्साहाचे वातावरण असते व जयंतीच्या निमित्ताने घराघरात रंगरंगोटी, नवीन कपडे, सजावटीचे सामान, अगोदर मिठाई, चिवडा व इतर पदार्थांची आवश्यकता असते. त्यामुळे व्यापार पेठही चालू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढाव्यात. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करता येईल, असे ते म्हणाले.