वडवणी (जि. बीड) : फलटण येथे आत्महत्या केलेल्या वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची शनिवारी रात्री मंत्री पंकजा मुंडे, मानवी हक्क अभियानचे मिलिंद आवाड यांनी भेट घेऊन सांत्वन केले. रविवारी सकाळी आमदार सुरेश धस, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार धनंजय मुंडे, महेबूब शेख, करुणा मुंडे यांनी भेट घेत प्रकरणात एसआयटीमार्फत चौकशी करावी, एसआयटीत आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली.
मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी रात्री नऊ वाजता वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. महिला डॉक्टर ही फलटण येथील सिस्टीमच्या विरोधात दाद मागत होती. अन्यायाच्या विरोधात तिने तक्रार दिली होती. या प्रकरणात कोणीही आरोपी सुटता कामा नये, अशी मागणीही त्यांनी केली. आमदार सुरेश धस यांनी प्रकरणातील पोलिस उपनिरीक्षक बदने हे खुर्चीवर बसून डॉक्टरला धमक्या देत होते. फिटनेस सर्टिफिकेट देण्यावरूनही वाद झाला होता. रात्री-अपरात्री फक्त महिला डॉक्टरला शवविच्छेदनासाठी बोलावले जात होते? बाकी मेडिकल ऑफिसर नव्हते का? असा सवाल त्यांनी केला.
खासदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिलांना सुरक्षा देताना हात वर करतात. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली आहे. पोलिस अधिकाऱ्यांची बाजू क्लिअर करण्यासाठी एक महिन्यांनी पत्र दिले आहे; परंतु महिला डॉक्टरच्या पत्राची दखल घेतली नाही. भाजपच्या आजी-माजी खासदारांचा उल्लेख असल्याने त्यांची सखोल चौकशी करून सीडीआर तपासला पाहिजेत. आरोपींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शेख मेहबूब यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारावर कारवाई करावी. खुलासा पत्रातील सर्वांची नार्को टेस्ट करावी. तर आमदार धनंजय मुंडे यांनी कोणी तोंड बांधून आमच्या भगिनीवर आरोप करत आहेत, असे होत असताना मी आता शासनाला स्वस्थ बसू देणार नाही. डॉक्टर महिलेला न्याय मिळवून देणारच, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.