परळी उपजिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी पाठविलेल्या निवेदनात अश्विन मोगरकर यांनी म्हटले आहे की, शहरात आता लसीकरण मोहीम जोरात चालू आहे. वयोवृद्ध व आजाराने ग्रस्त लोकांना लस देणे चालू आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची अँटिजन टेस्ट चालू आहे. नागरिकांतही स्वसुरक्षेबाबत जागृती मोठ्या प्रमाणात आहे. वैद्यनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात यावी, अशी लोकभावना होत आहे. जिल्हाधिकारी बीड यांनी श्री वैद्यनाथ मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. कोविडच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन ऑनलाइन पाठविण्यात आले आहे. असाध्य रोग नाहीसा करणारे धन्वंतरी प्रभू वैद्यनाथ मंदिर बंद ठेवण्यात येऊ नये, वैजनाथ मंदिर चालू ठेवल्यास कोरोना रुग्ण आढळत नाही, असे मत येथील वारकरी मंडळाचे कार्यकर्ते व नगरसेवक व गोपाळ आंधळे यांनी व्यक्त केले. वैद्यनाथ मंदिर परिसरातील इतर मंदिरेही चालू ठेवावीत, अशी मागणी आंधळे यांनी केली आहे.
८ मार्चपासून मंदिर बंद
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेले येथील श्री वैद्यनाथाचे मंदिर सर्वत्र कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २२ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सोमवारी काढले. यापूर्वी हे वैद्यनाथ मंदिर ८ मार्च ते १६ मार्चदरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. महाशिवरात्रीच्या दरम्यानचा यात्रा उत्सव कोरोनाची स्थिती लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी रद्द करण्यात आला. सध्या भाविक वैजनाथ मंदिर पायऱ्यांचे दर्शन घेऊन समाधान मानत आहेत.