बीड : जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असताना लोकांची गर्दी होत हाेती. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने ऑनलाइन नोंदणी करत मोजक्याच लोकांना बोलावून घेत लसीकरण करण्यास सुरुवात केली. यामुळे गर्दी टळत असून लसीकरण सुरळीत होत आहे. आरोग्य विभागाच्या या संकल्पनेमुळे सामान्यांना दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. मोजक्याच लस येत असताना लोक केंद्रावर गर्दी करीत होते. त्यामुळे वाद होत होते. ही बाब पोलीस आणि आरोग्य विभागासाठी त्रासदायक ठरत होती. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने http://ezee.live/Beed Covid 19 Registration ही वेबसाईट तयार केली. यातून ४५ वर्षांवरील ज्येष्ठांची नोंदणी करून घेतली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्या लोकांनी नोंदणी केली, त्यांना टोकन क्रमांकाप्रमाणे सोशल मीडिया व टेक्स मेसेज करून बोलावण्यात आले. तसेच काही लोकांना प्रत्यक्षात कॉल करून लस घेण्याबाबत कळविण्यात आले. यामुळे केंद्रावर होणारी गर्दी कमी झाली आहे. तसेच वादही बंद झाले आहेत. आरोग्य विभागासह पोलिसांचा ताणही यामुळे कमी झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम यांच्याकडून नियमित आढावा घेतला जात आहे.
सव्वातीन लाख लोकांनी घेतली लस
आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख २९ हजार ३८४ लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. यामध्ये २ लाख ४५ हजार २४५ लोकांनी पहिला डोस घेतला असून, ८४ हजार १३९ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. असे असले तरी १८ ते ४४ वयोगटातील केवळ ११ हजार ३७१ लोकांनी लस घेतली आहे. जिल्ह्यात जवळपास १४ लाख लाभार्थी या वयोगटातील आहेत. त्यांना अद्यापही लस घेण्याची प्रतीक्षा आहे.
ऑनलाइन नोंदणीमुळे केंद्रावर होणारी गर्दी कमी झाली आहे. टोकन क्रमांकाप्रमाणे मेसेज, कॉलद्वारे लाभार्थ्यांना बोलावले जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
- डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
===Photopath===
240521\24_2_bed_12_24052021_14.jpeg~240521\24_2_bed_11_24052021_14.jpeg
===Caption===
ऑनलाईन नोंदणी सुरू झाल्यानंतर मोजक्याच लोकांना बाेलावून लस दिली जात आहे. सुरक्षित आंतर ठेवलेले लाभार्थी. भावठाणा आरोग्य केंद्राची स्थिती.~ऑनलाईन नोंदणीपूर्वी केंद्रावर अशाप्रकारे गर्दी होत होती. भावठाणा आरोग्य केंद्रातील स्थिती दाखविणारे हे छायचित्र आहे.