- शिरीष शिंदे
बीड: सध्या विविध पक्षाच्या नेत्याचे, प्रमुख कार्यकर्त्यांच्या हाणामारीचे व्हिडीओ समोर येत आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी मस्साजोग खून प्रकरणाला अनुसरून मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे वंजारी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी मनाई आदेश लागू केला आहे.
राजकीय पक्ष संघटनेच्यावतीने न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलने, उपोषण, मोर्चे आदी होण्याची शक्यता आहे. तसेच इयत्ता १० व १२ वीची परीक्षा सुरु आहे. अचानक घडणाऱ्या घटनावरुन व किरकोळ कारणावरुन तणाव निर्माण होऊ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व समाज व राजकीय पक्ष आक्रमक आहेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने १९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीसाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
या कृत्यांना केली आहे मनाईशस्त्रे, सोटे, काठी, तलवार, बंदुक, जवळ बाळगता येणार नाहीत. काठया, लाठ्या शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत. कोणतीही, दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगता येणार नाहीत. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळा करुन ठेवता येणार नाहीत किंवा बाळगता किंवा तयार करता येणार नाहीत. आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत. जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुद्ध असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल तर ते कृत्य करता येणार नाही. सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी, जाहीरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करता येणार नाही. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणूक, मोर्चा काढता येणार नाही.