शिरूर कासार : ऊसतोड मजुरांचा तालुका अशीच काहीशी ओळख असलेला शिरूर तालुका मात्र जैवविविधतेने नटलेला आहे. अनेक दुर्मीळ वनस्पतींबरोबर पशुपक्षांचेही दर्शन घडले आहे. त्यात गुरुवारी आणखी पिवळ्या रंगाच्या बेडकाची भर पडली.
बुधवारच्या मध्यरात्रीनंतर दमदार पावसाने पहाटेपर्यंत तालुका ओलाचिंब केला होता. ठिकठिकाणी पाण्याचे डबके, डोह दिसत होते. सकाळच्या प्रहरी शहरातील द्वारका काॅम्प्लेक्सच्या मागे साहित्यिक कवी विठ्ठल जाधव यांना पिवळ्या बेडकाचा ‘डरांव डरांव’ आवाज ऐकायला मिळाला. आजपर्यंत शिरूरमध्ये अनेक दुर्मीळ जलचर, भूचर, खेचर, तसेच हवेत आकाशात भरारी घेणाऱ्या प्रजाती पहावयास मिळाल्या होत्या. त्यात पांढरा कावळा सर्वत्र गाजला होता. त्यावर ‘पांढरा कावळा’ अशी कादंबरी विठ्ठल जाधव यांनी लिहिली आणि गाजलीदेखील. योगायोगाने त्यांनाच गुरुवारी पिवळा बेडूक पहायला मिळाला. निसर्ग नियमाला अपवाद म्हणून काहीसा बदल घडून येत असल्याचे यावरून दिसून येते. कावळा काळा, पोपट हिरवा, बगळा पांढरा असे रंग असतात. मात्र, यात बदल दिसला की, तो कुतूहलाचा व अभ्यासाचा विषय बनतो. बेडकाच्या बाबतीत त्याचा सर्वसाधारण रंग ठरलेलाच असतो. आकारमान लहान-मोठे असते. पाऊस आणि बेडूक समीकरण ठरलेलेच असते. कधी कधी असंख्य बेडूक पिल्ले दिसल्यानंतर बेडकाचा पाऊस पडला, असेही म्हटले जाते. यातच पिवळ्या धमक बेडकामुळे तालुक्यात जैववैविधतेत भर पडली आहे.
पिवळ्या बेडकांना बुलफ्रॉग म्हणतात. बुलफ्रॉग दुर्मीळ नसतात. बुलफ्रॉग भारत, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. ही बेडकं आपला रंग बदलू शकतात. भारतीय बेडकाचा रंग फिकट पिवळा असतो. मान्सूनमध्ये नर बेडून मादी बेडकांना आकर्षित करण्यासाठी स्वतःला गडद पिवळ्या रंगात बदलतात. -- सिद्धार्थ सोनवणे, वन्यजीव अभ्यासक.
पिवळा बेडूक
हळद लागली बेडूकताई .. टूणटूण उडी लगीनघाई ...पावसाचे आगमन... तुझ्या पावलांनी होऊ दे ...शेतशिवारी बरकत.. सुवर्णमोती दगडू दे....- विठ्ठल जाधव
छायाचित्र - सुभाष शेंडगे
===Photopath===
170621\1640-img-20210617-wa0020.jpg
===Caption===
पिवळा बेडूक