धारूर : तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडण्यास आरणवाडी, चोरंबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हाण, ढगेवाडी येथील स्थानिक शेतकरी ग्रामस्थांचा विरोध असताना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी चुकीचे पाऊल उचलत सांडवा फोडला. त्यानंतर रास्ता रोको करताच सांडवा पूर्ववत केला. हा प्रकार चुकीचा असून, याची सखोल चौकशी करून कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जलसंपदामंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचे काम जलसंपदामंत्र्यांकडे सततच्या पाठपुराव्यामुळे यावर्षी पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्यावर पहिल्याच वर्षी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वानखेडे यांनी स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असतानादेखील धरणात ८० टक्के पाणीसाठा ठेवण्याचे तांत्रिक कारण दाखवित २५ जुलै रोजी सांडवा महसूल विभाग व पोलीस बंदोबस्तात फोडला. धरणातील २० ते ३० टक्के पाणीसाठा कमी करण्यात आला. या धरण परिसरात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर संबंधित अभियंत्याने हा सांडवा बांधण्याचा निर्णय घेऊन तो पूर्ववत केला. संबंधित विभागाचा सांडवा फोडण्याचा हा निर्णय चुकीचा होता. या प्रकाराची सखोल चौकशी करून मुख्य अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. सत्ताधारी आमदार सोळंके यांच्या या मागणीमुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.