माजलगाव (बीड) : बलात्कार करतो का? म्हणत भाजपा तालुका सरचिटणीस बाबासाहेब प्रभाकर आगे (वय ३४, रा. किट्टी आडगाव, ता. माजलगाव) यांची भर दुपारी कोयत्याने हत्या करण्यात आली. हत्येनंतर हल्लेखोराने पोलिस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली देत हत्येचे कारणही सांगितले. ही थरारक घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माजलगाव शहरात भरदुपारी वर्दळीच्या ठिकाणी घडली होती. यातील आरोपी नारायण शंकर फपाळ (वय ३८, रा. बेलुरा, ता. माजलगाव) याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी बाबासाहेब आगे यांची दुपारी अडीचच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. त्यानंतर नारायण हा स्वत:हून पोलिसांना शरण आला होता. त्याला १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश दिंडे हे करत आहेत. दरम्यान, बुधवारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची अधिक माहिती घेतली.
माजलगावातील थरारक घटना शहरातील भाजप कार्यालयातून बाहेर निघालेल्या बाबासाहेब आगे यांच्यावर वार होत असताना ते तेथून पळाले. वाचवा म्हणत बाजूलाच असलेल्या एका ओट्यावर बसलेल्या लोकांकडे बाबासाहेब पळाले असता त्यांच्यावर पाठलाग करणाऱ्या नारायण शंकर फपाळ (वय ३८, रा. बेलुरा, ता. माजलगाव) या आरोपीने कोयत्याने वार केला. ‘बलात्कार करतो का’ असे म्हणत त्यांच्या शरीरावर पुन्हा सपासप अनेक वार केले. यात बाबासाहेब यांचा जागीच मृत्यू झाला.हत्येनंतर आरोपी पोलिसांना शरण आला. या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.
दबा धरून केला वार माजलगाव बसस्थानकापासून जवळच असलेल्या व शाहूनगरमधील स्वामी समर्थ केंद्राच्या पाठीमागे असलेल्या भाजपा कार्यालयात भाजपाचे तालुका सरचिटणीस व बीड जिल्हा लोकसभेचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे आपल्या साथीदारासह बसले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडत असताना हातात कोयता घेऊन आलेल्या नारायण शंकर फपाळ याने अचानक येऊन बाबासाहेब आगेवर वार करण्याचा प्रयत्न केला. तो वार चुकवून बाबासाहेबांनी तेथून पळ काढला. बाजूलाच असलेल्या ओमप्रकाश शर्मा यांच्या घराच्या ओट्यावर अनेक जण बसले होते. त्या ठिकाणी 'वाचवा वाचवा' म्हणून ते पळत गेले; पण पाठीमागून आलेल्या नारायणने बाबासाहेब यांच्यावर एका बाजूने कोयत्याने वार केला. जखमी झालेला बाबासाहेब खाली पडल्याने त्यांच्या पोटात व डोक्यात त्याने अनेक वार केले. यात बाबासाहेबचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनेच्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता.
मी खून केला, आरोपी ठाण्यातबाबासाहेबची हत्या केल्यानंतर आरोपी नारायण हा स्वत:हून माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गेला. तेथे हजर अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याने आपण खून केल्याची कबुली देत तेथे बसला. यावेळी त्याच्या अंगावरील कपड्यांवरही रक्ताचे डाग होते. त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
सकाळपासूनच पाठलागसकाळपासून नारायण हा बाबासाहेब यांचा पाठलाग करत होता. तो भाजप कार्यालयात बसलेला असताना नारायण हा बाजूलाच असलेल्या एका दुकानासमोर दबा धरून बसला होता. जसा तो बाहेर आला, तसाच याने वार केला; परंतु बाबासाहेबाने वार चुकवला. पुढे जाऊन पुन्हा पकडून वार केले.
अनैतिक संबंधाचे कारण?बाबासाहेबाचे किट्टी आडगाव येथे एका महिलेशी प्रेमप्रकरण अनेक वर्षांपासून होते. याचीच कुणकुण नारायणला लागली. त्याने अनेकदा बाबासाहेबला समजावून सांगितले होते; परंतु त्यांनी ऐकले नाही. अखेर संतापलेल्या नारायण याने बाबासाहेबच्या हत्येचा निर्णय घेतला. तशी तोंडी कबुली नारायण याने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.