बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच यांची अपहरण करून हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगावातही अशीच घटना घडली आहे. माय-लेकाला बेदम मारहाण केली. नंतर तरुणाचे जीपमधून अपहरण करून त्याला वायर, रॉडने मारहाण केली. तो मरण पावला म्हणून त्या तरुणाला रस्त्यावर फेकून दिले. ही घटना १ मार्च रोजी घडली होती. या प्रकरणी सहाजणांविरोधात २ मार्च रोजी गुन्हाही दाखल झाला आहे; परंतु या मारहाणीचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला आहे.
कृष्णा दादासाहेब घोडके (वय २५, रा. घाटशीळ पारगाव, ता. शिरूर कासार) व संजीवनी घोडके अशी जखमींची नावे आहेत. कृष्णा यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मोठा भाऊ गणेश घोडके हा पत्नी शीतलसोबत खोपोली (जि. पुणे) येथे राहत होता. ७ जानेवारी रोजी गणेश व शीतल यांच्यात वाद झाला आणि शीतलचा मृत्यू झाला. या प्रकरणात गणेश हा सध्या कारागृहात आहे. त्यानंतर १ मार्च रोजी सकाळी १० वाजता कृष्णा हे टरबूज पिकावर फवारणी करत असताना अंकुश तांबारे, मंगेश तांबारे, रावसाहेब तांबारे, भारत तांबारे (सर्व रा. जांब, ता. शिरूर कासार) हे लोक तेथे आले.
त्यावेळी अचानक अंकुश तांबारे याने त्याच्याकडील लोखंडी रॉडने, मंगेश तांबारे याने डीपीच्या वायरने, रावसाहेब तांबारेने, लाकडी काठीने, भारत तांबारेने रबरी नळीने डोक्यात, पाठीवर, तोंडावर, पोटावर मारायला सुरुवात केली. त्यांपैकी अंकुश तांबारे याने 'गणेशला भेटायला कशाला गेला, त्याला वकील का लावला ?' असे म्हणत मारहाण केली. तेवढ्यात दादासाहेब बहीर यांनी तेथे संजीवनी घोडके यांना केस धरून ओढत आणले. त्यांच्यासोबत शिरू तांबारे हादेखील होता. या सर्वांनी संजीवनी यांनाही मारहाण करून शेतातच सोडून दिले; तर मारहाण करत कृष्णाला रोडला उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या गाडीत (एमएच १६ एटी ६६६९) पाठीमागच्या सीटवर टाकून एकनाथ वाडीच्या दिशेने घेऊन गेले. गाडीत आरडाओरड केल्याने रावसाहेब तांबारे व मंगेश तांबारे यांनी पुन्हा मारहाण केली. त्यानंतर चक्कर येऊन कृष्णा हे बेशुद्ध झाले. तो म्हणून या सर्वांनी त्याला सोडून निघून गेले; परंतु शुद्धीवर आल्यावर कृष्णा यांनी मदतीसाठी फोन करून पोलिसांना बोलावून घेतले.
खोक्यामुळे शिरूर चर्चेतसध्या आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता कुख्यात आरोपी सतीश ऊर्फ खोक्या भोसले याच्या व्हायरल व्हिडीओने शिरूर तालुका चर्चेत आहे. त्याने बाप-लेकालाही बेदम मारहाण केली होती. ही दोन प्रकरणे ताजी असतानाच आता रविवारी आणखी एक व्हिडीओ समोर आला. यात माय-लेकाला बेदम मारहाण केली आहे..