चिंचाळा : वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील उमेश शेंडगे नामक २८ वर्षीय युवकाने सोमवारी मध्यरात्री आपल्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. दुपारी ३ वाजेदरम्यान चिंचवडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आत्महत्या करण्यापूर्वी उमेश शेंडगे याने फेसबुकवर चार पोस्ट आणि काही ऑडिओ क्लिप व्हायरल केल्या. एका मुलीबरोबर असलेल्या प्रेम प्रकरणाचा उल्लेख करत नववीच्या वर्गात असतानापासून एकमेकांच्या प्रेमात पडलो, याचा खुलासाही उमेशने केला आहे. त्या मुलीसोबतचे काही फोटोही फेसबुकवर व्हायरल केले आहेत.
सहा महिन्यांपूर्वी याच मुलीला उमेशने गावातून पळवून नेले होते. याप्रकरणी उमेश शेंडगेवर पोक्सोंतर्गत, ॲट्रॉसिटी आणि कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मला गुन्हेगार ठरवत व आपल्या कुटुंबाची बदनामी झाली. प्रकरण पोलिस ठाण्यात गेल्यानंतर गावातील लोकांनी जाणूनबुजून आमच्या शेंडगे कुटुंबाला त्रास दिल्याचा उल्लेखही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. गावातील काही लोकांच्या भानगडींचे पुरावे असल्याचा मजकूरही पोस्टमध्ये आहे.
उमेशच्या कुटुंबीयांकडून आत्महत्येचे कारण सायंकाळी ६ वाजेपर्यंत सांगण्यात आले नव्हते; परंतु उमेशने सोशल मीडियावर फोटो आणि काही पोस्ट करून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत कोणतीच नोंद नव्हती.