बीड : संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात साजरी होत असताना, बीडच्या 'जयभीम महोत्सवाने' राज्यात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी स्वबळावर आणि स्वाभिमानाने साजरा होणारा हा उत्सव यंदा सामाजिक भान जपत 'डीजेमुक्त' साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जयंती नियोजनाच्या पहिल्याच बैठकीत समाजाने उत्स्फूर्तपणे तब्बल ७ लाख रुपयांची वर्गणी जमा करून एक नवीन आदर्श घालून दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने बीड शहरातील सामाजिक न्याय भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत २०२५ च्या जयंतीचा जमा-खर्च सादर करण्यात आला आणि २०२६ च्या नियोजनावर चर्चा झाली. यावर्षीच्या महोत्सवाची धुरा पूर्णपणे युवकांच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून, तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, बैठकीच्या विचारमंचावर तुलसी समूहाचे संचालक प्रा. प्रदीप रोडे, राजू जोगदंड, गौतम चोपडे, भगवान कांडेकर, बबन वडमारे, अजय सवाई, शितलकुमार सुकाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब गव्हाणे यांनी केले. या बैठकीला आंबेडकरी समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.
विचारांची जयंती, गोंगाटाची नाहीयावेळी पप्पू कागदे यांनी स्पष्ट केले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही विचारांची जयंती आहे, ती केवळ जल्लोषापुरती मर्यादित राहू नये. त्यामुळे यंदा डीजेचा कर्कश आवाज टाळून शिस्त, प्रबोधन आणि सामाजिक संदेशाला प्राधान्य दिले जाईल." तसेच, मिरवणुकीत समाजप्रबोधन करणारे विविध देखावे सादर करणाऱ्या मंडळांना सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
नियोजन समितीची घोषणासदरील बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२६ ची नियोजन समिती घोषित करण्यात आली. यामध्ये मनोज वाघमारे, सुमेध जोगदंड, विजय समुद्रे, महादेव इनकर, प्राचार्य पंडित मुने, उद्धव बनसोडे, ॲड. राजेश शिंदे, स्वप्नील चोपडे, संतोष गायकवाड, दयानंद सरपते, ॲड. तेजस वडमारे, ॲड. नितीन वाघमारे, सोनू सरवदे, प्रा. रोहित डोंगरे, संजय जाधव, प्राचार्य प्रदीप गाडे, प्रा. प्रेमानंद सिरसट, विनोद कांबळे, सुरेश साबळे, कल्याण भंडारे, अशोक ठोकळ, प्रा. अशोक गायकवाड, शरद मगर यांचा समावेश आहे.