लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेवराई तालुक्यातील नागझरी परिसरातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे ४ ट्रॅक्टर व १ जेसीबी जप्त केले. ५ आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास केली.दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी राजापूर परिसरात अवैध वाळू साठ्यावर मोठी कारवाई केली. त्यानंतर तरी अवैध वाळू उपसा बंद होईल अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा सुरु ठेवल्याचे समोर आले आहे. नागझरी परिसरातून वाळू उपसा होत असल्याची माहिती विशेष पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सागडे यांना मिळाली. त्यांनी शनिवारी पहाटे २ वाजता सापळा लावला. अचानक छापा मारुन एक जेसीबीसह ४ ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. तसेच ५ आरोपींनाही ताब्यात घेऊन गेवराई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, अंकुश वरपे, रेवणनाथ दुधाणे, गणेश नवले, हनुमंत राठोड आदींनी केली.
नागझरीमध्ये ४ ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:03 IST