पुरुषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातील सोन्नाथडी येथील रहिवासी जानकीराम पवार (५०) यांना मे महिन्यात दमछाक होऊ लागल्याने कोरोनाची टेस्ट केली. त्यात ते पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर तपासणीत त्यांचा स्कोर २५ व ऑक्सिजन पातळी ६५ आली. ग्रामीण रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार घेऊन २६ दिवसांनंतर ते घरी पोहोचले व आता आनंदाने आपल्या कामात व्यस्तही झाले आहेत.
माजलगावपासून २० कि.मी. अंतरावरील सोन्नाथडी येथील जानकीराम अन्सीराम पवार यांना १० मे रोजी दम लागत असल्याने त्यांनी अगोदर गावातच दाखविले. थोडाफार फरक पडताच पुन्हा त्यांना दम लागत असल्याने त्यांच्या मुलाने त्यांना तात्काळ कोरोना चाचणीसाठी माजलगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये नेले. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांचा स्कोअर २५ आला. हे पाहून मुलगा हवालदिल झाला. त्यामुळे त्यांनी मित्र सभापती अशोक डक यांना फोनवर कळवून सल्ला घेतला. डक यांनी ग्रामीण रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. तेथे नेल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी ६५ पर्यंत खाली आल्याचे निदर्शनास आले. यावेळी येथील अधीक्षक डॉ. सुरेश साबळे व डॉ. गजानन रुद्रवार यांनी ही केस आव्हान म्हणून रुग्णालयात रीतसर दाखल करून उपचार सुरू केले.
उपचारादरम्यान त्यांना ऑक्सिजन लावला. जवळपास सहा रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यानंतर जानकीराम यांनी उपचारास प्रतिसाद दिल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. २५ दिवस उपचारानंतर जानकीराम यांना १० जून रोजी सुटी दिली. २५ स्कोअर व ६५ ऑक्सिजन असताना सरकारी दवाखान्यात डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर जानकीराम पवार घरी परतले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व सध्या सीएस डॉ. सुरेश साबळे, डॉ. गजानन रुद्रवार, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रवीण वारकरी, डॉ. विजय पवार व डॉ. अविनाश गोले यांच्यासह सर्व नर्सचा समावेश होता. जानकीराम पवार यांच्यावर आम्ही आव्हान म्हणून उपचार केले. यात आम्ही यशस्वी झालो, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन रुद्रवार यांनी सांगितले.
मित्रामुळे मी वाचलो
मला कोरोना झाला, त्यात मी वाचेल की नाही अशी अवस्था झालेली असताना माझे बालपणीचे मित्र व मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक आबा डक यांनी हिंमत देत मला सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याचा सल्ला दिला. तीन वेळा भेटायला आले. एवढे उपचार झाल्यानंतर मला एक रुपयाही खर्च न लागता मी घरी आलो. आज मी दिसत आहे तो केवळ मित्रामुळेच.
-जानकीराम पवार, कोरोनामुक्त रुग्ण
दृष्टिकोन बदलतोय
येथील ग्रामीण रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ७० कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यात १५ रुग्णांना रेफर करण्यात आले. सध्या येथे पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी उपचार घेतलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. यामुळे सरकारी रुग्णालयाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे.
===Photopath===
260621\purusttam karva_img-20210624-wa0060_14.jpg~260621\img_20210624_123253_14.jpg