बीड : जिल्ह्यात मागील १३ दिवसांत तब्बल २२०२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यातील १७०४ जणांनी कोरोनाची लसच घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लस न घेतलेल्यांना कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसत आहे. रुग्ण वाढण्यास लसीचा तुटवडा की नागरिकांचा गाफीलपणा जबाबदार आहे, याचा विचार करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे.
राज्यातील कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी व्हायचे नाव घेत नाही. एकूण बाधितांचा आकडा आता एक लाखाच्या घरात पोहोचत आहे. तसेच मृत्यूच्या आकड्यानेही अडीच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मृत्यूदर आणि नवे रुग्ण कमी करण्यासाठी आता लसीकरणच पर्याय असल्याचे दिसत आहे. परंतु जिल्ह्यात लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. आठवड्याला सरासरी २० हजार डोस प्राप्त होत आहेत. त्यामुळे लोकांची गर्दी होत आहे. काहींना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
दरम्यान, ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे, त्यांचे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण नगण्य आहे. पहिला डोस घेऊन पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण २२ टक्के असून दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांचे प्रमाण ७ टक्के आहे. लस न घेतलेल्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा तब्बल ७७ टक्के एवढा आहे. यावरून लसीकरणाची किती आवश्यकता आहे, हे स्पष्ट होत आहे. शासनाने लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
...
तुटवडा असल्याने पर्याय नाही
जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी पूर्ण नियोजन केलेले आहे. परंतु शासनाकडूनच अपुरा साठा येत असल्याने आम्हाला पर्याय नाही. लस संपल्याने काहींना रिकाम्या हाताने परतावे लागते, हे खरे असले तरी हा प्रश्न जिल्हास्तरावरून सोडविण्यासारखा नाही. जसा पुरवठा होईल, तसे वितरण केले जात आहे.
डॉ. रौफ शेख, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.
---
१३ दिवसांतील आकडेवारी
एकूण पॉझिटिव्ह - २२०२
पहिला डोस घेतलेले ४८८
दुसरा डोस घेतलेले १६९
एकही डोस न घेतलेले १७०४
---
आठवड्यातील बाधितांची संख्या
४ ऑगस्ट १८१
५ ऑगस्ट १९४
६ ऑगस्ट २१२
७ ऑगस्ट १५१
८ ऑगस्ट २१६
९ ऑगस्ट १६७
१० ऑगस्ट १५०
100821\10_2_bed_7_10082021_14.jpeg~100821\10_2_bed_8_10082021_14.jpeg
डाॅ.रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड