आष्टी : तालुक्यात १६४९ घरकुल मंजूर असून, यापैकी एक हजार घरकुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. २०० घरकुल पूर्ण झाली आहेत. आष्टी पंचायत समितीच्या अंतर्गत घरकुलचे पेमेंट वेळेत टाका, सर्वसामान्य घरकुल लाभार्थ्यांना विनाकारण त्रास होऊ नये, नसता संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी सांगितले.
ग्रामसेवक व गृहनिर्माण अभियंत्यांनी ३१ मार्चअखेर घरकुल पूर्ण करायचे आहेत. त्यांनी आपल्या गावात जाऊन आपले घरकुल पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी अडचणी येणार नाहीत. तसेच अकुशलचे पेमेंट वेळेत टाकावे, विनाकारण लाभार्थ्यांना पंचायत समितीमध्ये चकरा माराव्या लागत असल्याने याची काळजी प्रत्येक गावचे ग्रामसेवक व एम. आर. ई. जी. एस.च्या ऑपरेटरने घ्यावी, कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये, अशा सूचना देत कारवाईचे संकेत गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सभापती माधुरी जगताप, उपसभापती रमेश तांदळे यांनी दिले.