बीड : जिल्ह्यातील कोरोना स्थितीवर प्रशासनाने बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे. चाचण्यांची सरासरी तेवढीच ठेवूनही नवे बाधित सापडण्याचे प्रमाण आटोक्यात आल्याचे दिसत आहे. रविवारी ५ हजार २०० जणांच्या तपासणीत १३१ नवे रुग्ण आढळून आले. दरम्यान, रविवारी पुन्हा चार जणांचा मृत्यू झाला तर १०५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी दिली गेली.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले होते. मात्र, आता स्थिती नियंत्रणात असली तरी मृत्यूदर कायम असून तो कमी होत नाही. रविवारच्या अहवालानुसार ५ हजार २०० जणांच्या कोरोना चाचण्या केल्या गेल्या. यात ५ हजार ६९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर १३१ नवे रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ९, आष्टीत ३३, बीडमध्ये ३०, धारूरमध्ये ७, गेवराईत १७, केजमध्ये ३, माजलगावात ३, परळीत ४, पाटाेद्यात १३, शिरुरमध्ये ५ आणि वडवणीत ७ जण कोविड संसर्ग झालेले आढळून आले.
दरम्यान, रविवारी मागील २४ तासांत ४ आणि जुने ७ अशा ११ मृत्यूंची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर झाली. १०५ जणांना दिवसभरात सुटी दिली गेली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९१ हजार ५५४ इतकी झाली आहे. तर, बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ८७ हजार ८१६ इतका आहे. आतापर्यंत कोरोनाने २ हजार ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार २४९ रुग्ण उपचाराखाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.