अनेकदा आपण आपल्या त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांमुळे हैराण असतो. मग अनेकजण केमिकलयुक्त प्रॉडक्टपासून ते घरगुती उपायांचा वापर करतो. पण अनेकदा याचा फायदा काही होत नाही. याचं कारण आपल्या रोजच्या काही चुका. या चुका आपली त्वचा डॅमेज करतात आणि आपल्याला त्याची खबरही लागत नाही. अशाच काही तुमच्या सवयींबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
फार जास्त स्वीमिंग करणे
उन्हाळा सुरु झाल्यावर अनेकजण स्वीमिंगचं प्लॅनिंग करु लागतात. मात्र स्वीमिंग करणे भलेही तुमच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी चांगलं असलं तरी सुद्धा स्वीमिंग पूलच्या पाण्यात टाकलेल्या क्लोरीनमुळे त्वचेचं नुकसान होतं. स्वीमिंग केल्यावर शॉवर घेतल्यावर सुद्धा क्लोरीन पूर्णपणे शरीरावरुन जात नाही आणि त्वचेच्या रोमछिद्रांपर्यंत पोहोचून त्यांना बंद करतं. अशात फार जास्त स्वीमिंग करणे त्वचेचा डॅमेज करु शकतं.
डाव्या-उजव्या कडेवर झोपणे
जर तुम्हालाही डाव्या आणि उजव्या कडेवर झोपण्याची सवय असेल तर तुमची ही सवय वेळीच बदला. कारण अशावेळी चेहरा उशीवर घासला, दाबला जातो. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात. तसेच उशीवरील तेलामुळे पिंपल्सही येतात.
गरम पाण्याने आंघोळ करणे
भलेही हिवाळा संपला असो काही लोक अजूनही रिलॅक्स वाटावं म्हणूण गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. काही लोकांना तर फार जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवयच असते. पण जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचं नुकसान होऊ शकतं. गरम पाण्यामुळे त्वचा फार ड्राय होण्यासोबतच त्वचेतील नैसर्गिक ओलावा देखील नष्ट होतो. त्यामुळे गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा.
जास्त मीठ किंवा साखरेचं सेवन
मिठात असलेलं सोडियम तसं तर शरीरासाठी एक आवश्यक तत्व आहे. पण जर पदार्थांमध्ये याचं प्रमाण अधिक झालं तर याने त्वचेतील ओलावा नष्ट होतो आणि यामुळे त्वचा रखरखीत, निर्जिव आणि कोरडी दिसू लागते. तर जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यानेही त्वचेचं नुकसान होतं. साखरेमुळे त्वचेचं कोलाजनचं प्रमाण प्रभावित होतं. याने त्वचा सैल होऊ लागते.
पॅसिव्ह स्मोकिंग
तुम्ही भलेही स्मोकिंग करत नसाल पण तुमच्या आजूबाजूला कुणी स्मोकिंग करत असेल तर तुम्हीही पॅसिव्ह स्मोकिंग करताय. याने तुमच्या आरोग्याला तर धोका होतोच सोबतच त्वचेलाही नुकसान होतं. सिगारेटच्या धुरामध्ये असलेल्या हानिकारक निकोटीन आणि टारमुळे त्वचेचं नुकसान होतं. याने त्वचा वयस्कर दिसू लागते.