महिला असो किंवा पुरूष प्रत्येक व्यक्ती आपल्या केसांवर प्रेम करते. केस काळे आणि मुलायम असावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. हल्लीच्या काळात बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध होतात. ही उत्पादनं तयार करणाऱ्या प्रत्येक कंपनींकडून असा दावा करण्यात येतो की, या उत्पादनांच्या वापराने तुमच्या केसांबाबतच्या सगळ्या समस्या दूर होतील आणि केस सुंदर होतील. पण यामध्ये कितपत तथ्य आहे, हे आपण सर्वच जाणतो. पण खरं पाहायला गेलं तर केसांचं सौंदर्य टिकवून ठेवणं इतकं अवघडही नाही. काही घरगूती उपाय केल्यानं केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.
कोमट तेलाने केसांना मालिश केल्यानं काही दिवसांतच केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. कोमट तेल केसांना लावल्यानं तेल थेट केसांच्या मुळापर्यंत पोहोचते. सामान्य तेलापेक्षा कोमट तेलानं मालिश करणं केसांचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. जाणून घेऊयात कोमट तेल केसांना लावल्यानं कोणते फायदे होतात...
1) कोमट तेल केसांना लावल्यानं ते थेट केसांच्या मुळापर्यंत जातं. यामुळे केसांच्या मुळांजवळील स्कॅल्पवर मॉइश्चर(डोक्याची त्वचा) टिकून राहण्यास मदत होते. ज्यामुळे केस आणि स्कॅल्पचे आरोग्य चांगले राहते.
2) कोमट तेलानं मालिश केल्यानं ब्लड फ्लो नीट राहतो. त्यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते.
3) जर तुमची डोक्याची त्वचा फार ड्राय असेल तर, कोमट तेलानं मालिश करणं फायदेशीर ठरतं. ज्या व्यक्ती जास्तीतजास्त वेळ घरातून बाहेर राहतात किंवा सतत उन्हात काम करतात त्यांच्यासाठी कोमट तेलानं मालिश करणं फायदेशीर ठरतं.
4) कोमट तेलानं मालिश केल्यानं केस गळणं कमी होते. मालिश करताना केस थेट मुळांजवळ गेल्यानं केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते.
5) केसांमध्ये कोंडा झाला असेल तरीदेखील कोमट तेलानं केसांना मालिश करणं फायदेशीर ठरतं.