अनेक तरूणींना शॉर्ट ड्रेसेस किंवा स्कर्ट घालण्याची इच्छा असते, पण त्यांना एका कारणाने इच्छा असूनही शॉर्ट ड्रेसेस घालता येत नाहीत. ते कारण म्हणजे गुडघ्यांवरील काळेपणा. गुडघ्यांवरील खाळेपणामुळे अनेक तरूणी शॉर्ट कपडेच वापरत नाहीत. अनेक तरूणी मग वॅक्सिंग आणि ब्लीच करतात, पण याने गुडघ्यांचा काळपटपणा दूर होत नाही. अशात आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.
गुडघ्यांवर काळपटपणाचं कारण
द हेल्थ साइटने दिलेल्या एका वृत्तानुसार, मुळात गुडघे हा शरीराचा असा भाग आहे, ज्याच्या स्वच्छतेची फार काळजी घेतली जात नाही. जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा सगळं लक्ष पोटावर जातं, आपण गुडघे बघू शकत नाही. जेव्हा आपण बसतो तेव्हा गुडघे स्ट्रेच होतात, त्यामुळे त्यांचा रंग आहे त्यापेक्षा वेगळा दिसतो. अशात शरीराच्या इतर अंगांसारखीच गुडघ्यांची स्वच्छता किंवा काळजीही महत्त्वाची ठरते.
वय आणि वजनाचाही पडतो प्रभाव
जर तुमचं वजन कमी असेल तर तुमचे गुडघे जास्त स्वच्छ दिसतात. तेच वय वाढल्यावर त्वचा सैल होऊ लागते. गुडघ्यांवरीलही त्वचा सैल होते, ज्यामुळे त्यांचा रंग डार्क दिसतो. तसेच तुमचं वजन जास्त असेल तर कमी वजन असलेल्यांच्या तुलनेत तुमचे गुडघे जास्त काळे दिसतात.
हळद, दूध आणि मध
हळद आणि दूध त्वचेचा रंग उजळवण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरतात. एक चमचा हळद, २ चमचे दूध आणि १ चमचा मध मिश्रित करा. ही पेस्ट गुडघ्यांवर लावून २ मिनिटे मालिश करा. नंतर १५ ते २० मिनिटांनी गुडघे कोमट पाण्याचे स्वच्छ करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास तुम्हाला फरक दिसेल.
दूध आणि बेकिंग सोडा
१ चमचा बेकिंग सोड्यात एक चमचा दूध टाका आणि ही पेस्ट गुडघ्यांवर लावून स्क्रबप्रमाणे घासा. नंतर गुडघे पाण्याने स्वच्छ करा. दर दोन दिवसांनी हा उपाय करा. काही दिवसांना तुम्हाला फायदा दिसेल.
लिंबाचा वापर
लिंबामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी केवळ शरीरासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतं. जर तुमचे गुडघे काळे असतील तर त्यावर लिंबूने घासा. काही वेळाने गुडघे पाण्याने स्वच्छ करा. काही दिवस हा उपाय केल्यास तुम्हाला फरक बघायला मिळेल.
(टिप : वरील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण काहींना वरील गोष्टींची अॅलर्जी असून शकते. त्यामुळे आधी तज्ज्ञांकडून जाणून घेतलेले बरे.)