प्रत्येक किचनमध्ये आता सहजपणे पुदीना मिळतो. पुदीन्यामुळे केवळ पदार्थांना चव देण्याचं नाही तर याचे अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. त्वचेसाठी तर वेगवेगळ्या दृष्टीने पुदीना फायदेशीर ठरतो. पुदीना थंड असल्याने त्याने एक वेगळाच अनुभव मिळतो. सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पुदीना उपयोगात येतो. पुदीन्यामध्ये असणारे अॅंटी-बॅक्टेरिअल गुण त्वचेची खोलवर स्वच्छता करतात. चला जाणून घेऊ याचे फायदे....
स्कीन न्यूट्रिशनसाठी
पुदीन्याच्या पानांचा गुणधर्म थंड असतो. काकडीप्रमाणे पुदीना सुद्धा त्वचेला मॉइश्चराइज करण्याचा उपयोगात येतो. पुदीन्याच्या पानांच रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा तजेलदार होते आणि सोबतच त्वचा कोमलही होते. या रसाने त्वचेवरील बंद झालेली रोमछिद्रे मोकळी होतात. त्यासोबतच त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी पुदीन्याच्या पानांचा वापर केला जातो. पुदीन्याचा पानांचा रस दह्यात किंवा मधात मिश्रित करुन त्वचेवर लावावा.
चमकदार चेहऱ्यासाठी
त्वचेवर ड्रायनेसची समस्या होणे ही एक सामान्य बाब झाली आहे. ड्रायनेसपासून बचाव करण्यासाठी डाएटमध्ये पुदीन्याचा समावेश करावा. कारण यातून भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. सोबतच त्वचेवर एक चमकदारपणा येईल. त्यसोबतच पुदीन्याने केवळ त्वचेची स्वच्छताच होते असं नाही तर याच्या नियमित वापराने त्वचेची रंगतही वाढते. यासाठी नियमितपणे त्वचेवर पुदीन्याच्या पानांची पेस्ट लावावी.
सनबर्न आणि टॅनिंगसाठी
या दिवसात आग ओकणाऱ्या सूर्याच्या संपर्कात आल्याने त्वचा काळवंडते. अशात चेहऱ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी आणि चेहरा उजळवण्यासाठी पुदीन्यातील ओमेगा-३ फॅटी अॅसिड फायदेशीर ठरतं. टॅनिंगची समस्या झाल्यावर त्वचेवर पुदीन्याच्या ताज्या पानांचा लेप चेहऱ्यावर लावल्यास लगेच फायदा दिसतो. तसेच उन्हाळ्यात सनबर्नची समस्याही सामान्य आहे. सनबर्न त्वचेवर मुलतानी मातीमध्ये पुदीन्याचा रस किंवा पिपरमेंट ऑइल मिश्रित करुन लावल्यास आराम मिळेल.
पिंपल्ससाठी
पुदीन्यामध्ये त्वचेचा फायदा पोहोचवणारे अॅसिड असतात. हे अॅसिड चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करतात. पुदीन्याचा पानांमध्ये सॅलीलीलिक अॅसिड असतं. जे पिंपल्स आणि त्यामुळे होणारे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. यासाठी पुदीन्याच्या पानांची पेस्ट चेहऱ्यावर लावा. तुम्हाला हवं तर यात तुम्ही थोडं गुलाबजलही मिश्रित करु शकता. काही दिवसातच तुम्हाला चेहऱ्यात फरक दिसून येईल. मिंट मास्क
पुदीन्यामुळे त्वचेला थंड वाटतं. तसेच याने पिंपल्सची समस्याही कमी होते. त्यामुळे अनेक महिला मिंट मास्कचा वापर करतात. पुदीन्याचा आहारात समावेश करण्यासोबतच मास्क म्हणूणही वापर करा. मिंट मास्क तयार करण्यासाठी पुदीन्याची ताजी पाने घ्या आणि ते पाण्यात टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पिंपल्स असलेल्या ठिकाणांवर लावा. मास्क चांगल्याप्रकारे सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.