डार्क सर्कल म्हणजे, सुंदर चेहऱ्याला लागलेलं ग्रहण असंही म्हणता येईल. डार्क सर्कल्समुळे सुंदर डोळ्यांसोबतच चेहऱ्याचं सौंदर्यही बिघडतं. अनेकदा डार्क सर्कल्सपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यात येतो. तसेच महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्सही केल्या जातात. पण तुम्हाला माहीत आहे का? महागडी उत्पादनं आणि ब्युटी ट्रिटमेंट्स व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही हेल्दी पदार्थांचा समावेश करून आणि घरगुती उपायांनी ही समस्या दूर करू शकता.
सध्या अनेक महिलांसोबतच पुरूषही डार्क सर्कल्सच्या समस्यांनी त्रस्त आहेत. असंतुलित आहार, जोपेची कमतरता, तणाव यांसारख्या कारणांमुळे ही समस्या उद्भवते. जाणून घ्या डार्क सर्कल्सपासून सुटका करण्यासाठी काही घरगुती उपाय...
1. टोमॅटो आणि लिंबू
टोमॅटो डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी मदत करतात. टोमॅटोचा रस लावल्याने त्वचा मुलायम होते. तुम्ही टोमॅटोचा थोडा रस आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करा. तयार मिश्रण डोळ्यांखाली लावा. साधारण 15 मिनिटांसाठी ठेवा. जेव्हा हे मिश्रण सुकेल त्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
2. कोल्ड टि-बॅग
डार्क सर्कल्सपासून सुटका करण्यासाठी तुम्ही कोल्ड टि-बॅगचा वापर करू शकता. एक ग्रीन टी बॅग घेऊन पाण्यामध्ये ठेवा. साधारण एक तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यानंतर ते डोळ्यांवर ठेवा. नियमितपणे असं केल्याने डार्क सर्कल्सची समस्या दूर होते आणि त्वचा पुन्हा उजळण्यास मदत होते.
3. संत्र्याचा रस
संत्र्याचा रस डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी मदत करतो. यामुळे त्वचेचा उजाळा वाढतो. यासाठी संत्र्याच्या रसामध्ये एक ते दोन थेंब ग्लिसरीन एकत्र करा. डोळ्यांभोवतीच्या काळ्या वर्तुळांवर हे अप्लाय करा. 15 मिनिटांसाठी सुकू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याच्या मदतीने धुवून घ्या. याच्या नियमित वापराने चेहऱ्यावर उजाळा येण्यासही मदत होते.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)