आता लवकरच थंडीला सुरूवात होणार आहे. या ऋतूमध्ये त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. खाज, त्वचा ड्राय होणे, जळजळ होणे, ओठ फाटणे यांसारख्या वेगवेगळ्या समस्या फार अधिक बघायला मिळतात. अशात त्वचेची काळजी घेणं फारच कठीण होऊन बसतं. हिवाळा सुरू होण्याआधीच काही त्वचेची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेतलं तर होणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात. या दिवसात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास घरगुती उटण्यांचा तुम्ही वापर करू शकता.
१) मुल्तानी मातीचं उटणं
हिवाळ्यात त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी मुल्तानी माती फारच फायदेशीर मानली जाते. या दिवसात चेहऱ्यावर साबण लावण्याऐवजी मुल्तानी मातीपासून तयार उटणे लावू शकता. हे उटणं तयार करण्यासाठी थोडी मुल्तानी माती घ्या. त्यात थोडं ऑलिव्ह ऑइल आणि गुलाबजल टाका. नंतर हे उटणं चेहऱ्यावर, मानेवर आणि हाता-पायांना लावा. अर्ध्या तासाने चेहरा आणि हात-पाय कोमट पाण्याने धुवावे. तुम्ही आंघोळही करू शकता. याने त्वचेचा रखरखीतपणा दूर होऊन त्वचा मुलायम होईल.
२) मसूरच्या डाळीचं उटणं
मसूरची डाळ खाऊनही त्वचेला वेगवेगळे फायदे होत असतात. या डाळीचं उटणं तयार करण्यासाठी दोन-तीन चमचे मसूरची डाळ बारीक करा. आता यात अर्धा कप दूध टाकून एक तासासाठी तसंच राहू द्या. डाळ फुगल्यावर ती मिक्सरमधून बारीक करा. ही पेस्ट ३० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. याने त्वचा मुलायम होईल आणि त्वचेचा ड्रायनेसही दूर होईल.
३) संत्र्याच्या सालीचं उटणं
संत्री खाऊन त्याची साल फेकू नका. कारण याने तुमचं सौंदर्य खुलवण्यात फायदा होतो. संत्र्याची साल सुकायला ठेवा. त्यानंतर त्याची पावडर तयार करा. या पावडरमध्ये थोडं मध टाका. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून काही मिनिटे तशीच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हिवाळ्यात त्वचेवर डाग दिसणार नाही आणि चेहरा उजळलेला दिसेल.