बँकॉक : आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त पी.व्ही. सिंधूला थायलंड ओपन वर्ल्ड टूर सुपर बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी येथे जपानच्या नोजोमी ओकुहारा हिच्याविरुद्ध सरळ गेम्सने पराभव पत्करावा लागल्याने तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यातील पराभवामुळे सिंधूची या वर्षीच्या पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.द्वितीय मानांकित सिंधूला पूर्ण लढतीतच सूर गवसला नाही. ओकुहारा हिने सुरुवातीलाच वर्चस्व राखले आणि अखेर ५0 मिनिटांत २१-१५, २१-१८ असा विजय नोंदवला. विजेतेपद हुकण्याची सिंधूची या वर्षीची ही तिसरी वेळ होती. त्याआधी या भारतीय खेळाडूला इंडिया ओपन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेआधी ती मलेशिया आणि इंडोनेशिया ओपनमध्ये अनुक्रमे उपांत्य फेरी आणि उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली होती.सिंधूने ओकुहाराविरुद्ध काही क्षणी आपल्या सर्वोत्तम खेळीची झलक दाखवली. दुसरीकडे जपानच्या खेळाडूने दुसऱ्या गेममधील सुरुवातीचे काही क्षण वगळता सामन्यावर नियंत्रण ठेवले. ओकुहाराने पहिल्या गेममध्ये ६-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने आक्रम क्रॉस कोर्ट फटके मारले आणि अंतर १५-१७ असे कमी केले. तथापि, ओकुहाराने सिंधूला चुका करण्यास भाग पाडले व सलग चार गुण वसूल करताना गेम जिंकला. सिंधूने दुसºया गेममध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही दबावाखाली आल्याने ओकुहाराने बाजी मारत जेतेपदप पटकावले.
पी. व्ही. सिंधू उपविजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 04:01 IST