नवी दिल्ली : ‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर आता माझे लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्ण पदक आहे,’ अशी प्रतिक्रिया भारताची विश्वविजेती बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने खास ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रविवारी बासेल (स्वित्झर्लंड) येथे सिंधूने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकाविताना जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा २१-७, २१-७ असा एकतर्फी पराभव केला. विशेष म्हणजे जागतिक जेतेपद पटकावणारी सिंधू भारताची पहिली शटलर ठरली.
या दिमाखदार विजयानंतर सोमवारी सिंधू, प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांच्यासह मायदेशी परतली. यावेळी तिचे देशवासीयांनी जल्लोषात स्वागत केले. मंगळवारी सिंधूने लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा तसेच ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची भेट घेतली. यावेळी प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांचीही उपस्थिती होती.
या भेटीदरम्यान सिंधूने विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा यांच्याशी चर्चा करताना स्पर्धेदरम्यानचा अनुभव सांगितला. त्याचप्रमाणे, ‘आता माझे मुख्य लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचे असून त्यादृष्टीने मी कठोर मेहनत घेत आहे,’ असेही सिंधूने म्हटले. सिंधूने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह झालेल्या भेटीचीही माहिती दिली. स्पर्धा संपवून बासेल ते दिल्ली असा थकवा आणणारा प्रवास केल्यानंतरही सकाळी सिंधूने मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे सिंधूसाठी मोदी यांनीही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढला. ‘मोदींसोबत चर्चा करताना त्यांचे क्रीडा ज्ञान, त्यांच्याकडे भारतीय संस्कृती व देशहिताच्या इतर गोष्टींची असलेली माहिती पाहून प्रभावित झाली,’ असेही सिंधूने म्हटले.