- अभिजीत देशमुखजकार्ता: महिला व पुरुष संघाच्या पराभवाने नक्कीच निराश झालो आहे. जापान आणि इंडोनेशिया बलाढ्य संघ असून त्यांचा विरुद्ध जिंकणे सोपे नसते, अशा शब्दांत राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपली निराशा व्यक्त केली.गोपीचंद पुढे म्हणाले की, ‘इंडोनेशिया घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांना थोडा मानसिक फायदा नक्कीच होता. सांघिक स्पर्धेत काही चांगले परिणाम मिळाले. सिंधू आणि प्रणॉयने आपला सामना जिंकला आणि दोघेही फॉर्ममध्ये दिसत आहे. सायना आणि श्रीकांत सामना जिंकू शकले नाही, पण तरीही दोघांनी खूप चांगले प्रदर्शन केले. वैयक्तिक स्पर्धेत याचा फायदा खेळाडूंना नक्कीच होईल.’घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इंडोनेशियाने भारतीय पुरुष संघाचा ३-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय खेळाडूंनी चांगली झुंज देत सामन्यात पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र, मोक्याच्यावेळी खेळ खालावल्याने यजमानांनी सरशी साधली. यानंतर भारतीय महिलांचाही पराभव झाला. बलाढ्य जापान एकतर्फी झालेल्या सामन्यात ३-१ अशी बाजी मारत भारताला सांघिक स्पर्धेतून बाहेर केले. हुकमी पी.व्ही. सिंधू जिंकली असली, तरी फुलराणी सायना नेहवालचा पराभव भारतासाठी चिंतेचे कारण ठरले.
Asian Games 2018: संघाच्या पराभवाने निराशा - गोपीचंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 05:30 IST