भारतात इलेक्ट्रीक वाहनांची विक्री म्हणावा तसा वेग घेत नाहीय. केंद्र आणि राज्य सरकारने सबसिडी कमी केली असून यामुळे आधीच महाग असलेल्या ईलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती आणखी वाढल्या आहेत. ओलाची जी एस१ प्रो काही वर्षांपूर्वी १.०८ लाखाला ऑनरोड मिळत होती ती आता १.८० लाखावर गेली आहे. असाच फटका मोठ्या वाहनांनाही बसला आहे.
जसजसे तंत्रज्ञान जुने होत जाईल तसे ईव्हींच्या किंमती उतरतील असे सांगितले जात होते. परंतू, उलटेच झाले आहे. सबसिडी कमी झाली, कंपन्यांनी किंमती वाढविल्याने ईव्हींच्या किंमती वाढलेल्याच आहेत. तरीदेखील गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये ईव्ही कारची विक्री ९० टक्क्यांनी वाढलेली आहे. असे असले तरी जेवढी विक्री अभिप्रेत होती तेवढी झालेली नाही, ईव्हीच्या विक्रीचा वेग हवा तेवढा वाढलेला नाही, असे निती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
अमेरिका, युरोपियन युनियन आणि चीनसारख्या देशांपेक्षा भारतात ईव्हीची विक्री मंदावलेलीच आहे. २०२४ मध्ये भारतात जेवढी वाहने विकली गेली, त्यात ईव्हीचा वाटा फक्त ७.६ टक्के आहे. २०३० पर्यंत हा वाटा ३० टक्के करण्याचे लक्ष्य आहे, परंतू पुढील पाच वर्षांत हे लक्ष गाठण्यासाठी तो पुरेसा नाहीय असे निती आयोगाचे म्हणणे आहे.
भारताने २०१६ मधील ५०,००० युनिट्सवरून २०२४ मध्ये २८ लाख युनिट्सपर्यंत ईव्ही विक्री वाढवली आहे. याच काळात जागतिक बाजारातील ईव्ही विक्री ९.१८ लाखांवरून १.८७ कोटी युनिट्सपर्यंत गेलेली आहे. ३० टक्क्यांचे लक्ष्य गाठायचे असेल तर पुढील ५ वर्षांत ईव्हीचा वाटा २२ टक्क्यांहून अधिक वाढवावा लागणार आहे.
दुचाकी आणि तीन चाकी ईलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीचा वेग आहे, परंतू कार आणि बस सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची विक्री खुपच मंदावलेली आहे. ट्रकसारख्या लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी ईव्ही घेण्यास सुरुवातही झालेली नाही. कमी किंमतीत कार आहेत, परंतू त्या शहरातच चालविण्याच्या रेंजच्या आहेत. तसेच ज्या जास्त रेंजच्या कार आहेत त्यांची किंमत ही १३-१४ लाखांपासून ते पार ३०-४० लाखांपर्यंत आहे. यामुळे याच श्रेणीतील पेट्रोल, डिझेलच्या कार या यापेक्षा खूप कमी खर्चात मिळतात. यामुळे लोक अजूनही याच कारकडे वळत आहेत. दुसरे कारण म्हणजे चार्जिंगची समस्या आहे. अद्याप म्हणावे तसे चार्जिंग सुविधा विकसित झालेली नाही. यामुळे बाहेरगावी जायचे असेल तर दुसरी कार आणि तिथल्यातिथे शहरात फिरायचे असेल तर ईलेक्ट्रीक कार अशा दोन दोन कार पोसण्याएवढा भारतीय श्रीमंत झालेला नाहीय. याचाही फटका ईव्हीच्या विक्रीला बसत आहे.