आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठी घडामोड घडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. अशातच भारतात गर्भश्रीमंत लोक, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले आहेत. सामान्यांच्या आवाक्यातला हा विषय नसला तरी लँड रोव्हर, जग्वार, रोल्स रॉयस, बेंटली, अॅस्टन मार्टीन, लोटस आणि मॅक्लारेन यासारख्या कंपन्यांचे डीलर मात्र अडचणीत आले आहेत. भारतीय उद्योगपतींकडून ही बुकिंग रद्द करण्यामागे मोठे कारण समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी रात्रीच ब्रिटनला पोहोचले आहेत. तिथे ते ब्रिटनसोबत महत्वाचा व्यापार करार करणार आहेत. यामध्ये ब्रिटनमधून आयात वस्तूंवरील कर मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. लँड रोव्हर, जग्वार, रोल्स रॉयस, बेंटली, अॅस्टन मार्टीन, लोटस आणि मॅक्लारेन या सारख्या महागड्या कार कंपन्या या तिथेच आहेत. सध्या या कंपन्यांच्या आयात कारवर ७५ ते १२५ टक्क्यांपर्यंत कर लागतो. तो करारानंतर १० टक्क्यांवर येणार आहे.
यामुळे भारतील गर्भश्रीमंत, बिझनेसमनमध्ये महागड्या कारची केलेली बुकिंग रद्द करण्यासाठी धावपळ उडाली आहे. आता करच निम्म्याने कमी होणार असल्याने कारच्या किंमतीही येत्या काळात धडामकरून कोसळणार आहेत. इंग्लंडमध्ये मिळणारी १ कोटी रुपयांची कार भारतात दोन ते सव्वा दोन कोटींना मिळत होती ती आता १ कोटी १० लाखांना मिळणार आहे. रोल्स रॉयस, बेंटलेसारख्या कंपन्यांच्या कार या १०-१२ कोटींपर्यंत जातात. त्यांच्या किंमती ५-६ कोटींवर येणार आहेत. हा पैसा वाचविण्यासाठीच या बुकिंग रद्द केल्या जात आहेत.
हे बिझनेसमन, गर्भश्रीमंत लोक कर कमी झाल्यावर पुन्हा बुकिंग करणार हे नक्की आहे. कदाचित जास्त गाड्या बुक करतील. यामुळे तसे पहायला गेले तर कंपन्यांचा भविष्यात फायदाच होणार आहे. परंतू, आता सध्या मागणी नसल्याने या कार कंपन्या भारतासाठी तयार होत असलेल्या त्यांच्या कार दुसऱ्या देशांना पाठवू लागल्या आहेत.
काही कारच्या किंमती या ब्रिटनपेक्षा तिप्पट आहेत. ती किंमत मोजून भारतीय ग्राहकांना लोकल टॅक्स आणि रजिस्ट्रेशन चार्ज देखील द्यावा लागतो. कारची मुळ किंमतच कमी झाली तर हा चार्जही कमी होणार आहे. यामुळे कारच्या किंमतीत मोठी घसरण होणार असल्याने या अब्जाधीशांनी पैसे वाचविण्याचा निर्णय घेतला आहे.