मुंबई:
मुंबईतील ई-दुचाकींच्या बॅटरीची अदलाबदल अर्थात स्वॅपिंग व्यवस्थेमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने दमदार पुढाकार घेताना, बॅटरी स्वॅपिंग स्टार्ट-अप उपक्रम ‘व्होल्टअप’ने आज अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटो यांच्याशी भागीदारी जाहीर केली. भारतात पहिल्यांदाच बॅटरी स्वॅपिंग स्टार्ट-अपने स्मार्ट मोबिलिटीला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, ओईएम आणि अंतिम पायरीपर्यंत सेवा देणाऱ्या भागीदारांच्या बरोबरीने कामाला सुरुवात केली आहे.
गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान १० ठिकाणी १२० कठड्यांसह (डॉक्स) सुरू होणारी, ही भागीदारी चर्चगेट ते मीरा-भाईंदर या पश्चिम मार्गावर वर्षाअखेरीस आणखी ५० स्थानांची भर घालणार आहे. बॅटरी स्वॅपिंगच्या सुविधेत सहज प्रवेश मिळावा यासाठी संपूर्ण शहरात स्मार्ट इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टेशन्स उभारण्याचा प्रयत्न म्हणून या भागीदारीद्वारे २०२४ पर्यंत मुंबईभर अशा ५०० बॅटरी स्वॅपिंग केंद्रे कार्यान्वित करण्याचा विचार सुरू आहे, ज्यायोगे दररोज ३०,००० हून अधिक दुचाकीस्वारांना सेवा पुरविली जाणार आहे.
चार्जिंग पायाभूत सुविधांचा अभाव, तशा सुविधा बाळगण्याची उच्च किंमत आणि विद्युत (इलेक्ट्रिक) वाहनांसाठी लागणारा दीर्घ चार्जिंग वेळ हे भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अवलंब करण्याच्या दिशेने प्रमुख अडथळे आणि आव्हाने आहेत. ही तफावत भरून काढण्यासाठी, व्होल्टअप, अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटो पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि त्याच्या विस्ताराच्या दिशेने एकत्र आले आहेत. सेवा जाळे, ऊर्जा आणि तंत्रज्ञानातील अंतर भरून काढणे असे या भागीदारीतून साधले जाणार आहे.
या एकजुटीमुळे, व्होल्टअप हे अनेक प्रसंगी दुचाकीची बॅटरी चार्ज करणे आव्हानात्मक असणाऱ्या झोमॅटोच्या डिलिव्हरी रायडर्सना त्वरित ऊर्जा प्रदान करण्यास सक्षम असेल. झटपट बॅटरी अदलाबदल केल्याने डिलिव्हरी रायडर्सना सतत बॅटरी चार्ज करण्यासाठी न थांबता, विनाखंड नित्याचा व्यवसाय करता येईल आणि जीवाश्म इंधनाला पर्यायी स्वच्छ इंधन वापरून त्यांचा वाहनचालनाचा खर्चही ३ रुपये प्रति किमीवरून कमी होऊन १ रुपया प्रति किमी होणार आहे.