अशोक दातारवाहतूक तज्ज्ञ
नवीन ई- बाइक टॅक्सी धोरण लागू झाले असून, वाहतुकीच्या नवीन व्यवस्थेमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जलद आणि स्वस्त प्रवासाचा आणखी एक चांगला पर्याय त्यामुळे तयार होत आहे. बदलत्या जगासोबत नवीन पर्यायांचा मुंबईकरांना फायदाच होणार आहे, त्यामुळे स्वस्त ई-बाइक टॅक्सी कोणाला नको, असा प्रश्न वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला.
ई-बाइक टॅक्सी सेवेबद्दल तुमचे मत काय ?
उत्तर : मुंबईसारख्या वाहतूक कोंडी असलेल्या शहरांसाठी ई-बाइक टॅक्सी हा एक उत्तम पर्याय आहे. रिक्षा आणि टॅक्सीचालक अनेकदा भाडे नाकारतात. या सेवेतून प्रवाशांना वाहतुकीसाठी स्वस्त आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. ई-बाइक टॅक्सीमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात येईल का?
उत्तर : कोणतीही नवीन व्यवस्था इतरांना अडथळा न करता रोजगार निर्माण करत असेल तर तिला विरोध करण्याची गरज नाही. खासगी आणि सरकारी क्षेत्रांप्रमाणेच सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातही नव्या संधी उपलब्ध होत आहेत. ई-बाइक टॅक्सीमुळे अनेक तरुणांना आणि रिक्षा/ टॅक्सीचालकांच्या मुलांनाही रोजगाराची संधी मिळू शकते.
या सेवेमुळे वाहतूक कोंडी कमी होईल का?
उत्तर : ई-बाइक टॅक्सी आकाराने लहान असल्याने ती कमी जागा व्यापते. त्यामुळे तिचा वापर वाढला तर शहरातील गर्दी नक्कीच कमी होईल. यासोबत खासगी वाहनविक्रीवर नियंत्रण ठेवणे आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्यावर बेदरकारपणे वाहने उभी केली जातात, यावर नियंत्रण हवे. सरकारने सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रित केल्यास खासगी वाहनांची संख्या कमी होईल. यासाठी ऑटो रिक्षा संघटनांनी ई-बाइक टॅक्सीला विरोध करण्याऐवजी सरकारवर सक्षम वाहतूक धोरण राबविण्यासाठी दबाव आणायला हवा.
ही सेवेच्या सुरक्षिततेबद्दल शंका घेतली जाते...
उत्तर : प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी नियम बनवले जातील. रिक्षा आणि टॅक्सीमध्येही क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केली जाते. तेव्हा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत नाही का? जागतिक पातळीवर ई-बाइकसारखे पर्याय निवडलेले असताना आपण संकुचित राहण्यापेक्षा त्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे. कमी/जास्त भाड्याबाबत माझा आक्षेप नाही, तो त्यांचा हक्क आहे. वाहतूक क्षमतेनुसार भाडे ठरवलेले असते. टॅक्सीतून ४ प्रवासी, रिक्षातून ३, तर ई-बाइक टॅक्सीमधून केवळ १ प्रवासी. त्यामुळे एका प्रवाशाला टॅक्सीने जाताना तीन प्रवाशांचे भाडे द्यावे लागते. ई- बाइक टॅक्सीमुळे पैशांची आणि वेळेची बचत होणार आहे.
टियर-२ शहरांत ई-बाइक टॅक्सीची गरज आहे का?
हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे. सरकारने अभ्यासपूर्वक काही निर्णय घेतले आहेत. बाइक टॅक्सी सुरू तरी होऊ देत. जर नसल्याचे दिसले तर साहजिकच ती बंद होईल. त्यामुळे गरज आहे की नाही हे या टप्प्यावर ठरविणे चुकीचे ठरेल.
- शब्दांकन : महेश कोले, प्रतिनिधी