जीएसटी दारात कपात झाल्यांनतर आता अनेक गाड्यांच्या किंमती देखील कमी झाल्या आहेत. यातच भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांना मोठा दिलासा देत, रेनॉल्ट इंडियाने त्यांच्या संपूर्ण लाइनअपवर जीएसटी २.० चा लाभ देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये रेनॉल्ट कंपनीच्या 'क्विड', 'कायगर' आणि 'ट्रायबर' या तीन मॉडेल्स सामील असणार आहेत. गाड्यांच्या या नव्या किमती २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील. एकीकडे टाटा मोटर्स, मर्सिडीज-बेंझ आणि महिंद्रा या मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांना जीएसटी कपातीचा फायदा देण्यास सुरुवात केली असतानाच आता रेनॉल्ट इंडियानेदेखील आपल्या गाड्यांवर मोठी सूट देत ग्राहकांना खास सरप्राईज दिले आहे.
नवीन किंमती आणि सवलतीरेनॉल्ट क्विडची किंमत४.३० लाख रुपयांपासून सुरू होऊन ५.९० लाख रुपयांपर्यंत जाते. या गाडीवर आता ४०,०९५ ते ५४,९९५ रुपये सूट देण्यात आली आहे. बजेट सेगमेंटमध्ये येणारी क्विड आता अधिक खिशाला परवडणारी बनली आहे, ज्यामुळे ती पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय बनली आहे.
रेनॉल्ट कायगरची किंमत ५.७६ लाख रुपयांपासून सुरू होते. या गाडीच्या बेस व्हेरिएंटवर ५३,६९५ रुपये आणि टॉप व्हेरिएंटवर ९६,३९५ रुपयांपर्यंत किंमत कमी करून मोठा दिलासा देण्यात आला आहे. आता या गाडीच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत १०.३४ लाख रुपये आहे.
त्याच वेळी, ट्रायबरची सुरुवातीची किंमत देखील ५.७६ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या गाडीच्या बेस ट्रिममध्ये ५३,६९५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. टॉप-स्पेक ट्रायबर आता ८.६० लाख रुपयांना खरेदी करता येईल, ज्यावर ८०,१९५ रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे.
कंपनीचे नियोजन काय?रेनॉल्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममिल्लापल्ली म्हणाले की, ग्राहकांना जीएसटीचा पूर्ण लाभ देणे ही कंपनीची बांधिलकी आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात गाड्यांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
नुकत्याच लाँच झालेल्या कायगर आणि ट्रायबर फेसलिफ्ट्समध्ये नवीन स्टाइलिंग आणि फीचर्सचा समावेश आहे. आता किमतीत कपात केल्याने हे मॉडेल्स आणखी परवडणारे होतील. तर, क्विड ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या काही एंट्री-लेव्हल कारपैकी एक आहे, जी बजेट-फ्रेंडली खरेदीदारांमध्ये लोकप्रिय आहे.