मुंबई : भारताची आतापर्यंतची सर्वात सुरक्षित असलेली मिनी एसयुव्ही Tata Nexon ची इलेक्ट्रीक कारवरून टाटा मोटर्सने पडदा उठविला आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत जानेवारीमध्ये लाँच केली जाणार असून बुकिंग 20 डिसेंबरपासून सुरू झाले आहे.
टाटाची ही दुसरी इलेक्ट्रीक कार आहे. या आधी टाटाने टिगॉकची इलेक्ट्रीक कार लाँच केली होती. मात्र, नेक्सॉनमध्ये अद्ययावत झिपट्रॉन हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे या कारची रेंज 300 किमीपेक्षा जास्त असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
नेक्सॉनला मॅग्नेंट एसी मोटर देण्यात आले आहे. याला लिथिअम आयनच्या बॅटरीद्वारे वीज मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे या बॅटरीला 8 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या बॅटरीची कॅपॅसिटी 30.2 kWh आहे. एकदा चार्ज केल्यावर ही कार 300 किमीचे अंतर पार करणार आहे.
नेक्सॉनची बॅटरी फास्ट चार्जरद्वारे 60 मिनिटांमध्ये 80 टक्के चार्ज होते. तर साध्या चार्जरमुळे 8 तास लागतात. फास्ट चार्जरद्वारे एका मिनिटाला 4 किमीचे अंतर पार करण्याची वीज मिळणार आहे. 50 टक्के चार्जमध्ये 150 किमीचे अंतर कापू शकते.