नवी दिल्लीः टाटा मोटर्स दिवसेंदिवस दर्जेदार गाड्या बाजारात आणत असून, त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटाची अल्ट्रॉज कारसुद्धा भारतीय बाजारात 22 जानेवारीला लाँच होणार आहे. पण तत्पूर्वीच गाडीसंबंधी एक चांगली बातमी समोर आली आहे. टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz)ला ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Global NCAP) क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळालं आहे. टाटा कंपनीसाठी हे मोठं यश आहे. खरं तर टाटा मोटर्सची अल्ट्रॉज ही दुसरी कार आहे, ज्या कारला ग्लोबल NCAPच्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तत्पूर्वी नेक्सॉनला ग्लोबल NCAPच्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग बहाल करण्यात आलं होतं. ग्लोबल NCAPनं टाटा अल्ट्रॉजला सुरक्षेसाठी 17 पैकी 16.13 अंक दिले आहेत. अल्ट्रॉजला प्रौढ प्रवासी संरक्षणामध्ये 17 पैकी 16.13 अंक मिळाल्यानं ती टाटा मोटर्ससाठी जमेची बाजू आहे. क्रॅश टेस्टदरम्यान टाटा अल्ट्रॉजनं चालक आणि पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाचं डोकं, मान आणि गुडघ्यांची चांगल्या पद्धतीनं सुरक्षा केली. त्यामुळेच क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5-स्टार रेटिंग मिळालं आहे. चाइल्ड प्रोटेक्शन क्रॅश टेस्टदरम्यान 1.5 वर्षांच्या डमी बाळाचीही सुरक्षा चांगली पद्धतीनं झाल्याचं समोर आलं आहे. परंतु क्रॅश टेस्टदरम्यान 3 वर्षांच्या मुलाच्या डमीची लावण्यात आलेली चाइल्ड सीट उघड झाली. त्यामुळे डमीचं डोकं कारच्या इंटिरियरला धडकलं. त्यामुळे काहीशी अंकात कपात आली. बाल संरक्षणात कारला 49पैकी 29 अंक देण्यात आले आहेत. त्यामुळे बाल संरक्षणात या कारला 3-स्टार रेटिंग बहाल करण्यात आलं आहे.
जगात भारी; टाटाच्या कारला 'क्रॅश टेस्ट'मध्ये फाईव्ह स्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 08:47 IST
टाटा मोटार्स दिवसेंदिवस दर्जेदार गाड्या बाजारात आणत असून, त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जगात भारी; टाटाच्या कारला 'क्रॅश टेस्ट'मध्ये फाईव्ह स्टार
ठळक मुद्दे टाटा मोटर्स दिवसेंदिवस दर्जेदार गाड्या बाजारात आणत असून, त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटाची अल्ट्रॉज कारसुद्धा भारतीय बाजारात 22 जानेवारीला लाँच होणार आहे. टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz)ला ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Global NCAP) क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळालं आहे.