नवी दिल्ली-
ओला इलेक्ट्रिक कंपनीनं (OLA Electric) भारतीय लष्करासोबत मिळून एक इलेक्ट्रिक स्कूटर रॅलीचं (Ola Electric Scooter Rally) आयोजन केलं आहे. पाच दिवसांच्या या रॅलीला हिमाचल प्रदेशच्या कसौली येथून सुरुवात झाली आहे. सूर्य कमांडचे १२ जवान रॅलीमध्ये कसौलीहून करचम मार्गे रोपाहून ८ जून रोजी भारत-चीन सीमेवरील शिपकी-ला (Shipki-La) येथे पोहोचणार आहेत. शिपकी-ला समुद्रपातळीपासून जवळपास १३ हजार फुटांच्या उंचीवर आहे.
कॅप्टन व्ही.राणा करताहेत नेतृत्वओलानं आयोजित केलेल्या या रॅलीचं नेतृत्व कॅप्टन व्ही. राणा यांच्याकडे आहे. लोकांमध्ये इलेक्ट्रीक स्कूटरचा वापर करण्याचं प्रोत्साहन देणं आणि याचे फायदे पटवून देणं असा या रॅलीचा उद्देश आहे. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात प्रत्येकानं योगदान द्यायला हवं असा संदेश या रॅलीतून देण्यात येणार आहे. एखाद्या इलेक्ट्रीक स्कूटरच्या माध्यमातून होणारी ही पहिलीच रॅली ठरणार आहे.
तब्बल ३९३ किमी प्रवास करणार१२ जवानांचं पथक Ola स्कूटर S1 Pro च्या माध्यमातून रॅली पूर्ण करणार आहेत. कसौलीहून शिपकी-ला हे अंतर जवळपास ३९३ किमी इतकं आहे.
ओला स्कूटर कंपनीनं आपल्या नव्या Move OS2 ऑपरेटिंग सिस्टमचं बिटा व्हर्जन देखील लॉन्च केलं आहे. या अपडेट नंतर कंपनीनं रिव्हर्स गिअर, स्लो स्पीड आणि मायलेजशी निगडीत समस्यांवर तोडगा काढल्याचा दावा करण्यात आला आहे. ओला स्कूटर रॅलीबाबत कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल यांनीही ट्विट केलं आहे. ओला स्कूटर रॅलीचा क्षण गौरवास्पद बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. १२ जवानांसह ३ ओला रायडर्स देखील असून एकूण १५ जणांचं पथक रॅली करत आहे.
नुकतंच ओला स्कूटरला लागलेल्या आगीच्या घटनांमुळे कंपनीच्या ब्रँड इमेजला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यानंही कंपनीला रामराम केला. तसंच ओला स्कूटरशी निगडीत अनेक तक्रारी देखील ग्राहकांनी सोशल मीडियात व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे कंपनीची प्रतिमा सुधारण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. ही रॅली देखील त्याचाच एक भाग म्हणून पाहिलं जात आहे.