एकीकडे जीएसटी कपातीनंतर भारतीय ग्राहकांचा कार खरेदीकडे कल वाढत असतानाच, आता ऑटो मार्केटमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. सुरक्षा मानकांमध्ये अर्थात सेफ्टी फीचर्समध्ये ५ स्टार रेटिंग मिळवणारी आणि सध्याच्या डिस्काउंट ऑफर्समध्ये जवळपास ७५००० रुपयांची सूट देणाऱ्या कारलाह्युंदाई या कंपनीने आपल्या वेबसाईटवरून हटवले आहे. ह्युंदाई इंडियाने 'टक्सन' ही प्रीमियम एसयुव्ही कार अचानक आपल्या अधिकृत वेबसाईटवरून काढून टाकल्याने आता भारतात या गाडीची विक्री देखील बंद केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ग्राहक आणि या कारचे चाहते यामुळे चांगलेच गोंधळात पडले आहेत.
ह्युंदाई टक्सन ही या कंपनीची एक लक्झरी एसयुव्ही कार आहे. या गाडीची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. ह्युंदाई टक्सनने भारतीय बाजारपेठेत तशी खूप आधीच एंट्री घेतली होती. मात्र, २०२२मध्ये चौथ्या पिढीतील नवीन टक्सन लाँच केली होती. 'सेन्सुअस स्पोर्टीनेस' या थीमवर आधारित या कारचं डिझाईन आहे. यात शार्प एलईडी डीआरएल, बोल्ड फ्रंट ग्रील आणि प्रीमियम केबिन लेआऊट यांचा समावेश होता. ही कार जीप मेरिडियन, स्कोडा कोडियाक आणि टोयोटा फॉर्च्यूनरशी थेट स्पर्धा करत होती. टक्सनच्या हायटेक आणि सेफ्टी सिस्टमने लोकांचे लक्ष वेधले होते.
ह्युंदाई टक्सनचे दमदार फीचर्स
ह्युंदाई टक्सन दोन इंजिन पर्यायांमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होती. यातले पहिले व्हर्जन २.० लीटरचे पेट्रोल इंजिन, १५४ BHP (ब्रेक हॉर्स पॉवर) एवढी शक्ती निर्माण करते. साध्या भाषेत सांगायचे तर, ही या गाडीची ताकद आहे. हे इंजिन १९२ Nm टॉर्क निर्माण करते.यात ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिलेला आहे, ज्यामुळे गिअर बदलण्याची गरज पडत नाही.
दुसरे व्हर्जन २.० लीटरचे डिझेल इंजिन, हे इंजिन पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त शक्तिशाली आहे, जे १८३ BHP एवढी शक्ती निर्माण करते. डिझेल इंजिनचा टॉर्क खूपच जास्त म्हणजे ४१६ Nm आहे. यात ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो, ज्यामुळे स्मूथ ड्रायव्हिंगचा अनुभव घेता येतो. याशिवाय डिझेलच्या टॉप मॉडेलमध्ये AWD अर्थात ऑल-व्हील ड्राइव्हचा पर्याय देखील मिळतो.
ह्युंदाई टक्सन ही अशा मोजक्या एसयूव्हीपैकी कार्सपैकी एक आहे, जिच्यात आरामदायक लक्झरी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा एकदम छान मेळ घातला गेला आहे. १०.२५ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ड्यूल-झोन क्लायमेट कंट्रोल, ३६०° कॅमेरा, लेव्हल-२ ADAS, ६ एअरबॅग्ज, हिल-होल्ड असिस्ट, यासोबत ABS, EBD, आणि TPMS असे सर्व अत्याधुनिक ब्रेकिंग आणि टायर प्रेशरचे मॉनिटरिंग करणारे सुरक्षा तंत्रज्ञान या कारमध्ये आहेत.
ह्युंदाई टक्सन कायमस्वरूपी बंद होणार?
ह्युंदाई इंडियाने नोव्हेंबर २०२५मध्ये आपल्या साईटवरून ही कार हटवल्याने आता भारतीय बाजारपेठेत या गाडीची विक्री बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अद्याप यावरून कंपनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. एकीकडे ही गाडी बंद झाल्याची चर्चा असतानाच, दुसरीकडे ह्युंदाई टक्सनचे एक नवीन अपडेटेड व्हर्जन किंवा फेसलिफ्टेड मॉडेल बाजारात लाँच केले जाईल, असे देखील म्हटले जात आहे.
ह्युंदाई टक्सन बंद होण्याची संभाव्य कारणे
जीप कंपास, सिट्रोएन सी-५ एअरक्रॉस आणि फोक्सवॅगन टिगुआन यांसारख्या प्रतिस्पर्धी गाड्यांच्या तुलनेत टक्सनची विक्री कमी होती. टक्सनमध्ये प्रीमियम फीचर्स भरपूर होते, पण त्यामुळे तिची किंमत खूप वाढली होती. टक्सन टॉप मॉडेलची ऑन-रोड किंमत ४० लाखांपेक्षा जास्त जात होती, ज्यामुळे ती गाडी फक्त काही निवडक ग्राहकांनाच परवडणारी होती.
मात्र, ह्युंदाईची २०२६मध्ये भारतात नवीन पिढीतील टक्सन फेसलिफ्ट आणण्याची योजना असू शकते. हे नवीन मॉडेल आधीच काही आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे. कंपनी आगामी काळात लागू होणारे नवीन उत्सर्जन नियम आणि सुरक्षितता नियम यांचे पालन करण्यासाठी आपल्या गाड्यांच्या श्रेणीत बदल करण्याची तयारी करत असेल, असे देखील असू शकते.
Web Summary : Hyundai India removed the Tucson SUV from its website, fueling speculation about discontinuation. Despite a 5-star safety rating and ₹75,000 discounts, sales lagged behind competitors. A facelifted model might launch in 2026.
Web Summary : हुंडई इंडिया ने टक्सन एसयूवी को वेबसाइट से हटाया, जिससे बंद होने की अटकलें तेज हो गईं। 5-स्टार सुरक्षा रेटिंग और ₹75,000 की छूट के बावजूद, बिक्री प्रतिस्पर्धियों से पीछे थी। 2026 में एक नया मॉडल आ सकता है।