कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सेमीकंडक्टरच्या तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. भारतीय वाहन उद्योगाला गेल्या दोन वर्षांत खूप अडचणीत टाकले आहे. चिपचा तुटवडा केवळ भारतातच नाही तर जगभरात निर्माण झाला आहे. याचा फटका देशातील सर्वात मोठी ईलेक्ट्रीक दुचाकी निर्माता कंपनी हिरोला बसला आहे.
Hero ने म्हटले आहे की सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे एप्रिलमध्ये डीलर्सना एकही वाहन पाठविलेले नाही. पुरवठा होत नसल्याने कंपनीला उत्पादनही थांबवावे लागले आहे. याचा परिणाम म्हणजे वेटिंगवर असलेल्या ग्राहकांना आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे.
प्रतीक्षा यादीतील ग्राहकांची प्रतीक्षा आता लांबली आहे. प्रतीक्षा किमान 60 दिवसांनी वाढली आहे. अनेक डीलर्सकडे प्रदर्शनासाठी ठेवायला देखील स्कूटर उपलब्ध नाहीत. हा प्रकार म्हणजे एका वेगवान ट्रेनला अचानक ब्रेक लावण्यासारखे आहे, असे सीईओ सोहिंदर गिल यांनी म्हटले आहे.
कंपनीची विक्री सतत वाढत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून सेमीकंडक्टरचा पुरवठा केला जात होता. परंतू, युक्रेन युद्धाने हा पुरवठाही थांबविला आहे. कंपनीने पर्यायी स्त्रोतांकडून चिपची व्यवस्था केली असून लवकरच उत्पादन सुरू केले जाईल. आम्ही या काळाचा वापर प्लांटची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी केला आहे, असे गिल म्हणाले.