जीएसटीमध्ये कपात झाल्याने दुचाकी, चारचाकींच्या किंमती कमी होणार आहेत. कंपन्यांनी त्या जाहीरही केल्या आहेत. मोठी एसयुव्ही असेल तर पाच ते सात टक्के आणि छोटी कार असेल तर १० ते ११ टक्के कर कमी होणार आहे. याचा परिणाम असा झाला आहे की अनेक ग्राहक बँकेत गर्दी करू लागले आहेत.
जीएसटी कमी होणार असल्याने कारच्या किंमती कमी होतील, ही कपात २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. ज्या लोकांनी नवरात्रीत, दसऱ्याला गाडी मिळावी या प्लॅनिंगने गाड्या बुक केल्या आहेत, त्यांचे लोन बँकांनी मंजूर केलेले आहे. परंतू, आता दर कमी आणि कर्ज जास्त असा प्रकार झाला आहे. दर कमी झाले तर या लोकांना कर्जही कमी लागणार आहे. यामुळे हे कर्ज मंजूर झालेले ग्राहक कर्ज रद्द करण्याच्या मागे लागले आहेत.
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकील १२ आणि २८ टक्क्याचा जीएसटी स्लॅब काढून टाकण्यात आला आहे. यामुळे ज्या वस्तू या करात येत होत्या त्या एकतर ५ आणि १२ टक्क्यांवर आल्या आहेत. तर प्रमिअम वस्तू या ४० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये गेल्या आहेत. यामध्ये वाहनेही आहेत. यामुळे १२०० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या कारच्या किंमती या ६० हजार ते १.५५ लाखांपर्यंत कमी झाल्या आहेत. याचा परिणाम आता बँकांवरही दिसून येत आहे.
ज्या ग्राहकांचे कार कर्ज आधीच मंजूर झाले होते ते आता कर्ज रद्द करण्यासाठी त्यांच्या संबंधित बँक शाखांशी संपर्क साधत आहेत. हे कर्ज रद्द करण्याचे शुल्क खुपच कमी आहे. २२ सप्टेंबरनंतर मिळणारा फायदा त्यापेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे, लोक जुने कर्ज सोडून कर्जाची प्रक्रिया नव्याने करण्याचा पर्याय निवडत आहेत, असे एका बँक मॅनेजरने सांगितले आहे.