भारतात आजपासून कारच्या क्रॅश टेस्ट सुरु केल्या जाणार आहेत. भारत एनकॅपमध्ये पहिल्यांदा कोणत्या कंपन्यांच्या कार चाचणीला जाणार यावरून चर्चा सुरू असताना महिंद्राला ऑस्ट्रेलियात जबर धक्का बसला आहे. ग्लोबल एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेल्या स्कॉर्पिओ एनला ऑस्ट्रेलियातील क्रॅश टेस्टमध्ये झिरो स्टार मिळाले आहे.
महिंद्रा कंपनी ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत आपले पाय रोवत आहे. तेथील लोक महिंद्राच्या धाकड एसयुव्हींना पसंदही करत आहेत. परंतु, ऑस्ट्रेलियन एनकॅपमध्ये महिंद्राला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. प्रत्येक देशाचे नियम वेगवेगळे आणि कठोर असतात. ग्लोबल एनकॅप आणि लॅटीन एनकॅपमध्ये त्यातलेत्यात कठोर नियमांवर कार टेस्ट केल्या जातात. परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये स्कॉर्पिओला झिरो स्टार सेफ्टी रेटिंग मिळाल्याने आता नेमक्या कोणत्या कार सुरक्षित असा प्रश्न लोकांना पडू लागला आहे.
ऑस्ट्रेलियन न्यू कार असेसमेंट प्रोग्राममध्ये महिंद्राने ही एसयुव्ही पाठविली होती. महिंद्राला फक्त एक फिचर नसल्याने झिरो स्टार मिळाला आहे. सध्या बोलबाला असलेल्या एडास फिचरला ऑस्ट्रेलियात खूप महत्व दिले जाते. ते स्कॉर्पिओ एनमध्ये नाहीय. महिंद्राच्या एक्सयुव्ही ७०० ला अडास फिचर आहे.
क्रॅश टेस्टमध्ये ड्रायव्हरच्या छातीला कमी सुरक्षा मिळत असल्याचे समोर आले आहे. असे असले तरी स्कॉर्पिओ एनला डायनॅमिक आणि साईड डायनॅमिक टेस्टमध्ये चांगले रेटिंग मिळाले आहे. यातून धडा घेत महिंद्रा येत्या काळात ऑस्ट्रेलियात स्कॉर्पिओमध्ये अडास फिचर देण्याची शक्यता आहे. भारतात स्कॉर्पिओने गेल्या काही वर्षांत सिनेमे असुदेत की राजकारण लोकांवर गारुड केलेले आहे. या कारची एक्स शोरुम किंमत १३.२६ लाखांपासून २४.५३ लाख रुपये अशी ठेवण्यात आली आहे.